बल्क औषध निर्मित प्रकल्पाला राज्य सरकारचा पुढाकार, तरीही शेतकऱ्यांचा विरोधच
By राजेश भोस्तेकर | Published: October 25, 2022 02:55 PM2022-10-25T14:55:04+5:302022-10-25T15:02:13+5:30
१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी; प्रकल्प धनदांडग्यांचे वैयक्तिक हित जपण्यासाठी, माजी भाजपाध्यक्ष ऍड महेश मोहिते याचा उद्योग मंत्र्यावर आरोप
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : मुरुड, रोहा तालुक्यात केंद्र सरकारचा होणारा बल्क औषध निर्मित प्रकल्प इतर राज्यात गेला असल्याने शेतकरी आनंदित होते. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून उभारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असून आजही त्याचा या प्रकल्पाला विरोध आहे. १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रकल्प नको असल्याबाबत आपला विरोध दर्शविणारा आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पाबाबत मांडलेली भूमिका धनदांडग्यांचे वैयक्तिक हित जपण्यासाठी आहे असा आरोप भाजपाचे माजी दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यांनी केला आहे.
मुरुड तालुक्यातील दहा आणि रोहा तालुक्यातील सात अशा सतरा गावात बल्क औषध निर्मित प्रकल्प उभारला जाणार होता. या प्रकल्पाबाबत शेतकरी, मच्छीमार यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तुषार शासकीय विश्रामगृह येथे भाजपचे माजी दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रकल्प कोणीही उभारत असला तरी शेतकऱ्यांचा आजही या प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याचे शेतकऱ्याच्या वतीने त्यांनी म्हटले आहे. यावेळी शेतकरी, मच्छीमार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
केंद्र सरकारने देशात तीन राज्यात प्रत्येकी एक हजार कोटींचे बल्क औषध निर्मित प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन महा विकास आघाडी सरकारने याबाबत केंद्राकडे रोहा, मुरुड तालुक्यात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती. या प्रकल्पासाठी पाच हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, मच्छीमार यांचा तीव्र विरोध आहे. प्रकल्प नको म्हणून अनेक आंदोलन, मोर्चे काढण्यात आले होते. अखेर हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. असे असले तरी विद्यमान उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे अलिबाग येथे आले असता बल्क औषध निर्मित प्रकल्प राज्य सरकार उभारणार असून एम आय डी सी मार्फत भूसंपादन केले जाणार असल्याचे जाहीर केले.
पालकमंत्री यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. प्रकल्प नको असताना तो लादण्याचा प्रयत्न सरकार मार्फत केला जात असल्याचे ऍड महेश मोहिते यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांना आधीच हा प्रकल्प नको अशी भूमिका समजावून सांगितली आहे. उद्योगमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाची भाजप नेत्यांना किंवा मंत्र्यांना माहिती नसल्याचेही मोहिते यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. उद्योगमंत्री यांनी मांडलेली भूमिका वैयक्तिक हित जपण्यासाठी आहे असा आरोपही मोहिते यांनी केला आहे.
मंगळवार १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी शेतकरी, मच्छीमार यांचा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार याना शेतकऱ्याची भूमिका सांगणार असल्याचे ऍड महेश मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे बल्क औषध निर्मित प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
शिंदे आणि भाजप मंत्र्यांमध्ये एक संधता नाही काय ?
उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बल्क औषध निर्मित प्रकल्प हा राज्य सरकार उभारणार असल्याचे जाहीर केले. मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी याबाबत भाजपचे मंत्री, आमदार याना याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री, आमदार याना भेटून याबाबत चर्चा करू असेही मोहिते पत्रकार परिषदेत म्हणाले. मात्र राज्य सरकार मधील उद्योगमंत्री प्रकल्पाबाबत ठामपणे सांगत असताना भाजपच्या मंत्र्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे शिंदे आणि भाजप मंत्र्यांमध्ये एक संधता नाही का असा प्रश्नही निर्माण होत आहे.