राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आज होणार उद्घाटन
By admin | Published: February 19, 2016 02:29 AM2016-02-19T02:29:44+5:302016-02-19T02:29:44+5:30
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व रायगड जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेनुसार आमदार चषक २०१६ कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष गट, जिल्हास्तरीय महिला गट, स्पर्धा शुक्रवारी
बिरवाडी : महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व रायगड जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेनुसार आमदार चषक २०१६ कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष गट, जिल्हास्तरीय महिला गट, स्पर्धा शुक्रवारी १९ फेब्रुवारीला सायं. ६.३० वा. महाड एमआयडीसीमधील एमएमए स्पोर्ट ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते होणार आहे.
शिवसेना, युवा सेना, बिरवाडी विभाग पुरस्कृत शिवराय प्रतिष्ठान, झंकार क्रीडा मंडळाच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून खासदार शिवसेने नेते गजानन कीर्तिकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवथरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवी मुंढे, शिवसेना सल्लागार प्रमोद घोसाळकर, रायगड जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाहक आस्वाद पाटील, घाटकोपरचे सुभाष पवार, बळीराम घाग, संजय पवार, संजय कदम, एमएमए सीईटीपीचे चेअरमन संभाजी पाठारे, महाड एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, एमएमएचे अध्यक्ष अमरित बोराई, एमएमएचे उपाध्यक्ष विनोद देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार २० फेब्रुवारीला रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, ठाणे महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नरेश म्हस्के, पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, ईबीपीएलचे एम.एस. ताम्हणकर उपस्थित राहणार आहेत. तर रविवारी २१ फेब्रुवारीला या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, आ. प्रकाश सुर्वे, आ. मनोहर भोईर, माजी ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसीय होणाऱ्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील पुरुष गटातील १२ जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने साखळी पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत.