अलिबागमध्ये राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 07:58 PM2017-08-20T19:58:41+5:302017-08-20T19:59:12+5:30
अलिबाग, दि. 20 - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 56 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग येथे 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात राज्य नाटय स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या पारितोषिक वितरण समारंभास केंद्रीय मंत्री अनंत गिते, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे,पालकमंत्री. प्रकाश महेता यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील आणि अलिबाग शहराचे नगराध्यक्ष श्री. प्रशांत नाईक या समारंभाला विशेष उपस्थिती म्हणून लाभणार आहे.
मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि व्यावसायिक या नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या कलाकारांना नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते प्रमाणपत्र, ¸रौप्यपदक, धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, दिग्दर्शन आणि रौप्यपदके यावेळी वितरित करण्यात येतील. पारितोषिक वितरण समारंभादरम्यान नाटय रंगोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केली असून लेखन योगेश सबनीस यांचे आहे. या कार्यक्रमात पूर्वा पवार, भरत सावले, पूर्णिमा अहिरे, हेमंत भालेकर, शिवाजी रेडेकर, प्रणव रावराणे, संपदा माने, अमोल बावडेकर व लावणीसम्राज्ञी प्रमिला लोदगेकर आणि देवदत्त नागे तसेच ज.एस.एम. आणि पी.एन.पी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लोकनृत्य यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. पारितोषिक वितरण समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात येत आहे.