संदिप जाधव /महाड जिल्हा परिषदेत सत्ताधारी कोण बसणार? याकडे सर्वत्र चर्चा होत असली तरी कुठल्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या शिवतीर्थाच्या सत्तेची चावी महाड व पोलादपूर तालुक्याकडेच राहणार असल्याचे राजकीय तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत.महाड तालुक्यात पाच, तर पोलादपूर तालुक्यातील दोन अशा सात जागांपैकी सर्वाधिक जागा जो पक्ष जिंकेल तोच पक्ष सत्ताधारी बनेल, अशा प्रकारचे राजकीय संकेत मिळत आहेत. रायगड जिल्ह्यात म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव, रोहा, कर्जत, खालापूर या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापशी आघाडी करीत सत्तेचे स्वप्न पाहिले आहे. तर पेण, अलिबाग, महाड तालुक्यांत मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे करीत या आघाडीत बिघाडी केली. अलिबाग, पेणमध्ये तर काँग्रेसने शिवसेनेशी आघाडी करीत शेकापक्ष, राष्ट्रवादी आघाडीसमोर जोरदार आव्हान उभे केले आहे. तर महाड तालुक्यातही कॉँग्रेसने स्वतंत्रपणे उमेदवार उभे क रून या तालुक्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेसमोर चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे महाड, पोलादपूर तालुक्यांत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष कुठला ठरणार यावरच जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाड व पोलादपूर तालुक्यांतील निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
शिवतीर्थाच्या सत्तेसाठी राजकीय तर्क-वितर्क
By admin | Published: February 23, 2017 6:14 AM