उरण (मधुकर ठाकूर): उरण परिसरातील विविध ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचे भुमीपुजन आणि खोपटे येथील सात कोटी खर्चाच्या राजिप शाळेच्या अद्यावत इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (१६) रात्री उशिरा राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पिरकोन गावात पार पडला.
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून येथील खासगी डिपी वर्ल्ड बंदराच्या सीआएस फंडातून सुमारे ७ कोटी रुपये खर्चून खोपटा गावात शाळेची अद्यावत इमारत उभारण्यात आली आहे.राजिपच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पिरकोन गावात पार पडला.तसेच पिरवाडी चौपाटीचे आणि आवरे गावातील तलावाचे सुशोभिकरण, केगाव गावातील रहिवाशांसाठी नव्याने तयार करण्यात येत असलेला रस्ता आणि इतर विविध विकास कामांचे भूमिपूजनही मंत्र्यांच्या हस्ते पार पडले.यावेळी मंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.
यावेळी पिरकोन येथे पक्षप्रवेश सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ. महेश बालदी, आ.प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक तथा राजिपचे माजी सदस्य जीवन गावंड, कलावती गावंड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नूकतेच अल्पशा आजाराने निधन झालेल्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांना मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी उरण तालुकाध्यक्ष रवींद्र भोईर, करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन प्रदिप नाखवा, महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे,उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, समिर मढवी, शहराध्यक्ष कौशिक शहा तसेच भाजपचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.