अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सात पंचायत समितींवर महिलाराज अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाची दोरी महिलांच्या हाती येणार असल्याने काही ठिकाणची पुरुषी राजवट संपुष्टात आली आहे. पंचायत समिती सभापतिपदासाठीचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृहात एका लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने काढण्यात आले. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
मुरुड, पेण पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील (नामाप्र) महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. पोलादपूर, म्हसळा, तळा आणि महाड पंचायत समितीच्या सभापतिपदी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. अलिबाग, उरण, कर्जत आणि सुधागड पंचायत समितीच्या सभापतिपदी आता सर्वसाधारण गटातील सदस्य विराजमान होणार आहेत. पनवेल पंचायत समितीच्या सभापतिपदी अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला कारभार पाहणार आहेत, तर रोहा पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
खालापूर आणि श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापतिपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आले आहे. माणगाव पंचायत समिती सभापतिपदी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून या आरक्षण सोडतीकडे विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. चिठ्ठी सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले तसेच त्यामध्ये जास्तीत जास्त महिलाराज आल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा अपेक्षा भंग झाला आहे. काहींनी या सोडतीबाबत नाराजी व्यक्त केली, तर काहींनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली.
म्हसळा सभापती आरक्षण सर्वसाधारण महिला
रायगड जिल्हात पंचायत समितीच्या सभापतिपदांची आरक्षणाची सोडत आजच जाहीर झाल्याने म्हसळा पंचायत समितीचे सभापती सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. यामुळे म्हसळा पंचायतीच्या सदस्यांचा अपेक्षाभंग झाल्याने आपल्या राजकीय कारकिर्दीत सभापतिपदाची उत्सुकता सदस्यांना असताना सभापतिपदाचा बहुमान आरक्षणामुळे गमवावा लागला आहे.
म्हसळा पंचायत समितीचे सदस्य मधुकर गायकर, संदीप चाचले यांनी उपसभापतिपद स्वीकारले होते. सुरुवातीला सभापती उज्ज्वला सावंत तर उपसभापती मधुकर गायकर यांनी सव्वा वर्षाचा कार्यकाळ पार पडला, त्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार पुन्हा सव्वा वर्षासाठी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले हे पदावर विराजमान झाले;
आपल्याला सभापतिपद भेटेल अशी अपेक्षा ठेवून काम करत असताना आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याने आपले दरवाजे बंद झाले. आता पुढील अडीच वर्षे दोन सदस्यांना उपसभापतिपदावरच समाधान मानावे लागणार आहे. तर सभापतिपदासाठी पुन्हा एकदा महिलाराज म्हणून उज्ज्वला सावंत यांना संधी प्राप्त झाल्याचे संकेत नाकारता येत नाहीत.