नागोठणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२ हजार ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच हे आंदोलन होत असल्याने ग्रामसेवकाअभावी नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा केली जात आहे.महाराष्ट्रातील ग्रामसेवकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनास २२ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. याबाबत येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांना विचारले असता, आमच्या सात मागण्या असून, प्रश्न मार्गी लागत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील एकही ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी संप मिटेपर्यंत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येणार नसल्याचे सांगितले. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती करणे, ग्रामसेवक संवर्गास शासन निर्णयाप्रमाणे प्रवास भत्ता मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बंद करून पदवीधर ग्रामसेवकांच्या नेमणुका कराव्यात. २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी वाढविणे. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर कराव्यात. २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे आणि आदर्श ग्रामसेवक राज्य/जिल्हास्तर आगाऊ वेतनवाढ करून एक गाव-एक ग्रामसेवक निर्मिती करणे आदी सात मागण्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आल्या आहेत, असे दिवकर यांनी सांगितले.
ग्रामसेवकांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 1:12 AM