अलिबाग : दैवी शक्तीच्या माध्यमातून जमिनीतील सोने काढून देतो, अशी बतावणी करून श्रीवर्धन-दिवेआगर येथील दाम्पत्याला सुमारे १७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा २०१२ ते २०१४ या कालावधीत घडलेला आहे. तब्बल पाच वर्षांनी या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दिवेआगर येथील एका कुटुंबाला त्यांच्याच मित्राने घरी येऊन दिवेआगर हे सोन्याच्या खाणीचे गाव आहे. तुमच्याच वाडीतील जमिनीमध्ये साने आहे, असे सांगितले. ठाण्यामध्ये दैवी शक्ती असणाऱ्या माझ्या ओळखीच्या आहेत. त्यांच्यामार्फत जमिनीतील सोने काढता येईल असे त्या कुटुंबाला पटवून दिले. त्यानंतर पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी २० हजार रुपये लागतील, असे सांगून मुंबईत बोलावून घेतले. त्यानंतर मे २०१२ या कालावधीत चार आरोपी हे या कुटुंबाच्या दिवेआगर येथील घरी पोहोचले. सोने ज्या ठिकाणी भेटणार आहे, ती जागा तपासली आणि रात्री ८ वाजता सोने मिळण्याचा मुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले.
पूजेचा विधी करून खड्ड्यात सोन्याची मूर्ती असल्याचे सांगितले. त्या वेळी त्यातून मूर्ती बाहेर काढली. सोन्याची मूर्ती असल्याने कोणास सांगू नका, असे बजावले. आरोपींच्या सांगण्यावरून २०१३ पर्यंत फसगत झालेले दाम्पत्य बँक खात्यात रक्कम भरत होते. आणखीन सोने असल्याचे सांगून जानेवारी २०१४ चा मुहूर्त साधून आरोपी पुन्हा दिवेआगरला आले. सोन्याच्या लालसेपोटी त्यांनी लाखो रुपये दिले. सोन्याची शहनिशा करण्याबाबत आरोपी टाळाटाळ करायला लागल्याने त्यांनी सोने एका सोनाराकडून तपासले, तेव्हा ते खोटे असल्याचे उघड झाले; परंतु तोपर्यंत आरोपींनी तब्बल १७ लाख ७७ हजार रुपये उकळले होते.