पीओपी बंदीमुळे धास्तावले मूर्तीकलेचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:21 AM2020-03-03T00:21:43+5:302020-03-03T00:21:50+5:30

गणेशमूर्तिकारांची पंढरी अशी ओळख असलेल्या पेण शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पर्यावरणाच्या हितासाठी घातलेल्या बंदीमुळे गणेशमूर्तिकारांची घालमेल होत असून त्यांची धडधड वाढली आहे.

Statue of sculpture scared by POP ban | पीओपी बंदीमुळे धास्तावले मूर्तीकलेचे माहेरघर

पीओपी बंदीमुळे धास्तावले मूर्तीकलेचे माहेरघर

googlenewsNext

दत्ता म्हात्रे
पेण : आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवलेले व गणेशमूर्तिकारांची पंढरी अशी ओळख असलेल्या पेण शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पर्यावरणाच्या हितासाठी घातलेल्या बंदीमुळे गणेशमूर्तिकारांची घालमेल होत असून त्यांची धडधड वाढली आहे. सुमारे १० ते १२ लाख तयार पीओपीच्या गणेशमूर्तींची विक्री कशी होणार, ही समस्या मूर्तिंकारांना सतावत आहे. २२ आॅगस्ट रोजी येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या ५ महिन्यांच्या कालावधीत नव्याने पीओपीच्या मूर्ती निर्माण कराव्यात की नाहीत, अशा संभ्रमावस्थेत पेणचे गणेशमूर्तिकार सापडलेले दिसत आहेत. त्यामुळे मूर्तिकारांना आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कायदेशीर लढ्याची तयारी सुरू झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पर्यावरणपूरक तथा इकोफ्रेंडली मूर्ती निर्माण करण्यात याव्यात, जेणेकरून जमीन आणि पाणीप्रदूषण होणार नाही. त्यामुळे शाडूमातीच्या मूर्ती या पर्यावरणपूरक असल्याने त्याच मातीतूद्वारेच मूर्ती साकारल्या जाव्यात असे न्यायालयाचे मत आहे.
प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्याने मूर्तीची विटंंबना होते व भग्न झालेल्या मूर्ती विसर्जन ठिकाणच्या परिसरात तशाच अवस्थेत दृष्टीस पडतात. न्यायालयात सादर झालेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पीओपीच्या वापरावरच पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. त्यामुळे पीओपीपासून मूर्ती निर्माण करण्याचा धोका व्यवसायाच्या दृष्टीने मूर्तिकारांना यापुढे पत्करता येणार नाही. गणेशोत्सवासाठी दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख मूर्ती पेण शहर व हमरापूर, तांबडशेत, जोहे विभागात तयार होतात.
या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस न्यायालयाने पीओपीवर बंदी घालण्याचा आदेश राज्य शासनाला दिल्याने लाखो गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक मूर्ती निर्माण करण्याचे शिवधनुष्य मूर्तिकारांना पेलणार नसल्याचे अनेक कार्यशाळांमधील मूर्तिकारांचे म्हणणे आहे. याशिवाय पीओपीवरील घातलेल्या बंदीमुळे गणेशमूर्तिकारांनी व्यवसायासाठी बँकांकडून काढलेल्या कर्जाची आर्थिक समस्या कशी दूर होणार, हाही मूर्तिकारांसमोरील महत्त्वाचा प्रश्न कायम आहे. या प्रकरणी गणेशमूर्तिकारांच्या बैठकीचे सत्र सुरू असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीसुद्धा सुरू आहेत.
>४५० ते ५०० चित्रशाळांची साखळी
गणेशमूर्तीकलेच्या या व्यवसायात पेण शहरात १५० चित्रशाळा, तर हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे या विभागात ४५० ते ५०० चित्रशाळांची भक्कम साखळीच उभी राहिलेली आहे. दरवर्षी या व्यवसायात नव्याने भर पडत आहे. सध्या पेण-खोपोली रस्त्यावर आंबेघर, धामणी या परिसरातही २५ ते ३० कार्यशाळा नव्याने उभ्या राहिल्या आहेत. स्थानिकांना हमखास रोजगार देणारा हा व्यवसाय असल्याने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांअभावी येथील युवावर्ग गणेशमूर्ती चित्रशाळांमधूनच आपला रोजगार मिळवत असल्याचे गेले अडीच दशकातील
हे चित्र कायम दिसत आहे. प्रत्येक घरातील दोन तरुणांचा सहभाग या व्यवसायात झालेला दिसत आहे.
>घरच्या घरी रोजगारनिर्मिती हे स्वयंरोजगाराचे ब्रिद गणेशमूर्तीकलेने येथील सर्व स्तरातील नागरिकांना दिलेले आहे. एकंदर न्यायालयाच्या आदेशाचा अनुमान लक्षात घेता न्यायालयाने कोणत्या स्वरूपाचे आदेश दिले आहेत. यावर कायदेतज्ज्ञांकडून, तसेच पर्यावरणतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. गणेशमूर्तिकार संघटनेने न्यायालयाचा दरवाजा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
- श्रीकांत देवधर, अध्यक्ष, गणेशमूर्तिकार संघटना
>पीओपी बंदीबाबत न्यायालयाने कोणते आदेश दिले आहेत. यासंदर्भातील तज्ज्ञांच्या मतांची माहिती घेऊन या विभागाशी संबंधित मंत्र्यांची बैठक लवकरच घेऊन मूर्तिकारांना योग्य ते मार्गदर्शन करू.
- सुनील तटकरे, खासदार

Web Title: Statue of sculpture scared by POP ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.