घरी राहून कुटुंबातील दोन सदस्यांनी केली कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:49 AM2021-05-04T01:49:19+5:302021-05-04T01:49:40+5:30
अलिबागमधील तुषार आणि मित कामत
निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोनाच्या संकटात अनेक जण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरत आहेत. यामध्ये बहुतांश नागरिक घरीच ठणठणीत होत आहेत. अलिबागमधील कामत कुटुंब एक उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. शेजारी, नातेवाइकांमुळे या कुटुंबाने कोरोनावर मात केली. विद्यानगर भागातील देवस्व रेसिडेन्सीमधील रहिवासी तुषार कामत सरकारी सेवेत आहेत. त्यांच्या घरी आई माधवी (६२), तुषार व त्यांची पत्नी तनिष्का मुलगा मित व मिहान असे ५ जण राहतात.
कार्यालया तपासणी केली असता कामत यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील इतरांची कोरोना चाचणी केली. त्यात त्यांचा मुलगा मितचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खबरदारी म्हणून सर्वांनी घरात गृहविलगीकरणाची सोय असल्याने डॉक्टरांच्या परवानगीने घरीच राहण्याचा निर्णय घेतला.
आई, पत्नी व एक मुलगा निगेटिव्ह असले तरी ते तिघेही एकाच घरात वेगळे राहत होते. घरात वेगवेगळ्या खोलीत तुषार व मित विलगीकरणात होते. घरामध्ये अंतर राखूनच व्हिडिओ काॅलमार्फत संवाद होत असे. यादरम्यान शेजारी व नातेवाइकांनी सहकार्य केल्याने लवकर कोरोनामुक्त झाल्याचे तुषार कामत यांनी सांगितले.
आमची एकजूट हीच आमची शक्ती
मी, माझी सून व नातू आम्ही तिघे पाॅझिटिह नव्हतो; पण माझा मुलगा व माझा नातू पाॅझिटिव्ह होता. त्यामुळे कशातच मन रमत नव्हते. मात्र, त्या दोघांना खुश ठेवण्यासाठी आम्ही चेहऱ्यावर उसने अवसान आणत होतो. कधी नातेवाइकांकडून जेवणाचा डबा येत होता. त्यात काही सामान आणण्यापासून ते सकारात्मक प्रोत्साहन देण्यापर्यंत शेजारी व नातेवाइकांनी सहकार्य केले. सगळे प्रकृतीची माहिती घेत व सल्ला देत होते.
- माधवी कामत
घरात दोघे कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने थोडा त्रास झाला. अगदी जीव भांड्यात पडला होता. मात्र, आम्हा कुटुंबाची एकजूटता हीच आमची खरी शक्ती ठरली. माझे पती व मुलगा यांना कोणताही त्रास न होता त्यांची टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. त्यामुळे घरीच दोघांवर उपचार करून त्यांना जेवणातही पौष्टिक आहार देऊन आज त्या दोघांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
- तनिष्का कामत.
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे असा सकारात्मक विचार आम्ही सतत केला. जेवणाचा डबा यूज ॲण्ड थ्रो पॅकिंगमध्ये यायचा. दिवसातून तीनदा गरम पाण्याची वाफ घेतली. जास्तीत जास्त आराम केला. घरातील स्वच्छतेवर भर दिला.
- तुषार कामत
खेळणे संपूर्ण बंद असल्याने, तसेच मनमोकळे फिरता येत नसल्याने सुरुवातीला त्रास झाला, पण दोन दिवसांनंतर त्रास कमी झाला. मात्र, शारीरिक त्रास जाणवला नाही. डॉक्टरांचा सल्ला, पौष्टिक आहार, जास्तीत जास्त आराम, घरातील स्वच्छता यावर भर दिला. घरात मास्क व सॅनिटायझरचा वापर केला. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात करता आली.
- मित कामत