रिक्षाचालकाच्या मुलाच्या हाती रुग्णांच्या आरोग्याचे स्टेअरिंग; जिद्द, चिकाटीच्या जोरावर झाला डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 10:14 AM2023-10-06T10:14:21+5:302023-10-06T10:15:26+5:30

आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनीअर व्हावे, हे स्वप्न प्रत्येक आई-वडील उराशी बाळगतात. विविध अडचणींसह प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही.

steering patient health into the hands of a rickshaw puller's son; He became a doctor through persistence and perseverance | रिक्षाचालकाच्या मुलाच्या हाती रुग्णांच्या आरोग्याचे स्टेअरिंग; जिद्द, चिकाटीच्या जोरावर झाला डॉक्टर

रिक्षाचालकाच्या मुलाच्या हाती रुग्णांच्या आरोग्याचे स्टेअरिंग; जिद्द, चिकाटीच्या जोरावर झाला डॉक्टर

googlenewsNext

रोहा : आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनीअर व्हावे, हे स्वप्न प्रत्येक आई-वडील उराशी बाळगतात. विविध अडचणींसह प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र अशाच हलाखीच्या परिस्थितीवर जिद्द, चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मात करीत रोहा खालचा मोहल्ला विभागातील रिक्षाचालक अ. समद कर्जिकर यांचा मुलगा सर्जिल याने वैद्यकीय शिक्षण घेऊन डाॅक्टरकीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे.

घरच्या हलाखीच्या परिस्थितीचा बाऊ न करता येणाऱ्या संकटांना धीराने सामोरे जाण्याचा निर्धार करीत सर्जिलने डाॅक्टर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने सुरुवातीपासून अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले. के. ई. एस. मेहेंदळे हायस्कूलमध्ये प्राथमिक ते डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये (वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच त्याच्यातील कौशल्याच्या जोरावर शेवटच्या वर्षी त्याची जनरल सेक्रेटरी पदावर निवडही झाली होती. कोरोना काळातही त्याने रुग्णसेवा केली होती.

हालाखीच्या स्थितीत मुलांचे उच्चशिक्षण

सर्जिल याला दोन बहिणी आहेत. त्यातील मोठी बहीण सामिया ही पदवीचे शिक्षण घेत आहे, तर दुसरी बहीण जुमाना ही ११वी विज्ञान शाखेत शिकत आहे. रिक्षाचालक अ. समद कर्जिकर यांचा पूर्वी दुधाचा व्यवसाय होता. मात्र, त्यात यश न आल्याने त्यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला.

रिक्षाचालक-मालक कमिटीतर्फे सन्मान

अनेक अडचणींना सामोरे जात अ. समद कर्जिकर यांचा मुलगा सर्जिल हा डॉक्टर झाला. याची दखल घेत पीर गाझी शेख सलाउद्दीन दर्गा रिक्षाचालक-मालक कमिटीच्या वतीने डॉ. सर्जिल अ. समद कर्जिकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Web Title: steering patient health into the hands of a rickshaw puller's son; He became a doctor through persistence and perseverance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.