नेरळ : नियोजनशून्य वाहतूक व्यवस्था व अतिक्रमणामुळे सतत वादाचा भोवऱ्यात असलेल्या नेरळ बसस्थानकात सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गहण बनला असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या बसस्थानकाला तलावाचे स्वरूप आले आहे. या साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.कर्जत आगाराच्या अंतर्गत हे बसस्थानक येत असून नेरळ शहर आणि कोल्हरे गावाच्या मध्यस्थानी असलेल्या नेरळ बसस्थानकाला कुणी वालीच नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नेरळ बसस्थानकातून दररोज हजारो वाहनांतून प्रवासी व मालाची वाहतूक होत असते. नेरळ शहर व नेरळ पूर्व भागातील सुमारे २५ गावातील रहिवासी येथून नित्य प्रवास करीत असतात. येथे एसटीची सुमारे ३५ वर्षे वहिवाट आहे. मात्र ही जागा खासगी मालकीची असून अद्याप ही जागा शासनाला एसटीकरिता संपादित करण्यात यश आलेले नाही. विशेष म्हणजे याकरिता कोणी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. प्रवाशांकरिता येथे खासगी वाहतूकदार व सार्वजनिक सेवा यात रस्सीखेच नेहमी सुरू असते. पावसाळ्यात या स्थानकात थांबण्यापेक्षा लवकर मिळेल त्या वाहनातून घर गाठण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत असतो.त्यातच थोडा जरी पाऊस झाला तरी हे पावसाचे पाणी स्थानकाबाहेर पडण्यास मार्ग नसल्याने पाणी स्थानकाच्या मध्यभागी तुंबते, यामुळे बसस्थानकास तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या साचलेल्या पाण्यातून कसा मार्ग काढायचा ही नित्याची डोकेदुखी बनली आहे. या तलावातून बाहेर पडताना लहान वाहन चालकांची दमछाक होते, तर एसटी चालकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कमी पडला तरी चिखल होत असल्याने या दलदलीतून वाहन चालताना नाकीनऊ येते. स्थानकाच्या चारही बाजूंनी होत असलेले अतिक्र मण व अवैध बांधकाम यावर स्थानिक प्राधिकरण अथवा शासन यापैकी कुणाचेही नियंत्रण नाही. या स्थानकात रस्ता बांधकाम करताना टाकण्यात आलेला मोठा ढिगारा अद्याप तसाच पडून आहे. या ढिगाऱ्यातील माती पावसाबरोबर वाहून स्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (वार्ताहर)- नेरळ स्थानकात प्रवास करणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थी व नोकरदार प्रवाशांची संख्या जास्त आहे. या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर स्थानिक पातळीवर तातडीने उपाययोजना केली जावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत असताना याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. नेरळ बसस्थानक हा नेरळ व परिसरातील प्रवाशांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून स्थानिक तसेच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून या बसस्थानकाचा कायमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.दुर्गंधी पसरली : नेरळ बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता आहे. हे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून वाट शोधावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी या स्थानकाची ही अवस्था असून एसटी प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र यावरून स्पष्ट दिसत आहे. नेरळ बसस्थानकाची जागा ही खासगी मालकीची असल्याने आम्हाला यात काहीही करता येत नाही. यासंदर्भात अनेक वेळा कर्जत तहसीलदार, कर्जत पंचायत समिती, कोल्हारे ग्रामपंचायत यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.- डी. एस. देशमुख, आगारप्रमुख, कर्जत
नेरळ बसस्थानकात साचले पाणी
By admin | Published: July 06, 2016 2:30 AM