सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई सीवूड येथील दरोड्यात वापरलेली स्विफ्ट कार कळंबोली पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर सापडली आहे. सदर कार चोरीची असून ती फेब्रुवारी महिन्यात वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती. दरोड्यानंतर कळंबोलीतील एका फायनान्स कंपनीच्याच कार्यालयाबाहेर ती कार उभी करून दरोडेखोर पसार झाले आहेत.शनिवारी भरदुपारी सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर अज्ञात सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकला. या दरोड्यात २३ किलो सोने व साडेनऊ लाख रुपयांची रक्कम चोरीला गेलेली आहे. ते सर्व जण स्विफ्ट कारमधून त्याठिकाणी आले होते. दरोडा टाकल्यानंतर ते पलायन करत असताना, काही प्रत्यक्षदर्शींनी कारचा नंबर नोंद केला होता. रविवारी दुपारी ती कार कळंबोली पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर रस्त्यालगत उभी असलेली आढळली आहे. दरोड्यावेळी कारवर एमएच ०४ एटी ८४२४ क्रमांकाची नंबरप्लेट वापरण्यात आली होती. अधिक तपासात ती स्विफ्ट कार चोरीची असून त्यावर वापरलेली नंबरप्लेट देखील बनावट असल्याचे उघड झाले. शिवाय कारमध्ये इतर एक बनावट नंबरप्लेट पोलिसांना सापडली आहे. सदर स्विफ्ट कार फेब्रुवारी महिन्यात वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली होती. तसा गुन्हा देखील त्याठिकाणी नोंद आहे.गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांचा तपास सुरु असताना, रस्त्यालगत बेवारस स्थितीत उभी असलेली ही कार पोलिसांच्या निदर्शनास आली. तपासासाठी आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त मधुकर पाण्डेय, उपआयुक्त दिलीप सावंत, प्रशांत खैरे, विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार केली आहेत.
सीवूडच्या दरोड्यात वापरलेली कार चोरीची
By admin | Published: August 09, 2016 2:27 AM