धाटाव : रोहा तालुक्यातील कोलाड हद्दीत चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, मंगळवारी रात्रीच्या सुमारास वरसगावजवळ उभ्या असलेल्या वाहनातून तब्बल ६ लाख ७६ हजार ७८० रु पये किमतीच्या २८० प्लास्टिक दाणा भरलेल्या २५ किलोच्या गोण्या चोरांनी लंपास केल्या आहेत. त्यामुळे कोलाडमध्ये चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. दिवसेंदिवस वाढतच जाणाºया चोºया रोखण्यास कोलाड पोलीस अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.फिर्यादी रूपेश रावकर (३२, रा. आंबेवाडी गणेशनगर, कोलाड) यांनी कोलाड पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी मंगळवारी रात्री वरसगाव हद्दीत एका गॅरेजसमोरील उघड्या मोकळ्या जागेत नेहमीप्रमाणे टेम्पो (वाहन क्र .एम. एच.४.ई एल ४६१३) हा उभा केला होता. यामध्ये सुमारे सहा लाख ७६ हजार ७६० रु पये किमतीच्या प्रत्येकी २५ किलो वजनाच्या २८० प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर ट्रेडमार्क (एम.ए.इन.झी.पी.ओ.एल.), त्यावर इन्व्हाइस नंबर एच.एम. ०१२ टी.पी.पी.ओ. ०३२ असा मार्क असलेला, प्रत्येक गोणीची बेल्टीप्रमाणे २४२७ असा किमतीचा माल होता. तसेच या वाहनात फिर्यादीसुद्धा झोपले होते. या झोपेचा फायदा घेत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने या उभ्या असलेल्या वाहनात प्रवेश केला व वाहनाचा पडदा व जाळी बाजूला सरकवून प्लास्टिक दाण्याचा माल लंपास केला आहे. याबाबत कोलाड पोलिसांत याची नोंद करण्यात आली असून, या चोरीचा पुढील तपास कोलाड पोलीस करीत आहेत.
वरसगावात प्लास्टिक दाण्यांची चोरी, कोलाडमध्ये चोरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 5:18 AM