काशिद येथे गाडीने घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:30 PM2019-05-27T23:30:12+5:302019-05-27T23:30:24+5:30
पुणे येथून संदीप निकम (३९) हे कुटुंबासह ओमनी व्हॅनने काशिद येथे येत असताना गाडीतून धूर येऊन गाडीने पेट घेतला.
आगरदांडा : पुणे येथून संदीप निकम (३९) हे कुटुंबासह ओमनी व्हॅनने काशिद येथे येत असताना गाडीतून धूर येऊन गाडीने पेट घेतला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
संदीप निकम हे गाडी क्रमांक एम एच १४ ए एम ६१४९ ने पत्नी सुरेखा निकम, भाऊ युवराज निकम, आदित्य साळुंके, आकाश साळुंके असे पाच जण मुरुड तालुक्यात फिरण्यासाठी आले होते. या गाडीमध्ये सीएनजी किट बसविले होते. दुपारी बोर्ली येथे जेवण करून ते काशिदकडे जात असताना त्यांची गाडी ही काशिद खिंडीत आली असता गाडीतून अचानक धूर येऊ लागल्याने चालक संदीप निकम यांच्यासहित गाडीत असणारे सर्वजण घाबरून गाडीबाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. त्यात पूर्णत: गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
>दासगावमध्ये कारचा टायर फुटल्याने अपघात
बिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगाव गावच्या हद्दीत कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत २६ मे रोजी दुपारी ४.२० वाजण्याच्या सुमारास कार क्र.एमएच ०८ झेड २९३२ ही मुंबई -गोवा महामार्गावरून रत्नागिरी बाजूकडून मुंबईकडे चालवीत घेवून जात असताना दासगाव गावच्या हद्दीत आल्यावर गाडीच्या समोरील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून आदळली. या अपघातात राजेश्री संदीप सहस्त्रबुद्धे (५२), सुमित संदीप सहस्त्रबुद्धे (२५), सौरभ संदीप सहस्त्रबुद्धे (२१) सर्व रा.ठाणे, मूळ रा.साखळकोंड ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी, सेफाली शिरीष घाग (५३,रा.ठाणे) हे जखमी झाले असून महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ह. एन.पी.तिडके हे करीत आहेत.