इंधन दरवाढीच्या किमतीने घेतला पेट; आर्थिक झळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 11:26 PM2021-02-10T23:26:01+5:302021-02-10T23:26:33+5:30
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले; दैनंदिन वापराच्या वस्तू महागल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि नाेकदारांना त्यामधून विशेष दिलासा मिळालेला नाही. त्यातच पेट्राेल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीने पेट घेतल्याने त्यांच्या आर्थिक झळा सर्वसामान्यांच्या बजेटला बसत आहेत. सरकारने पेट्राेल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दराने गेल्या चार महिन्यापासून चांगलीच उसळी घेतली आहे. पेट्राेल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे दैनंदिन वापरायच्या वस्तू चांगल्यात महागल्या आहेत.
किराणा वस्तू, भाज्यांचे दर वाढत असल्याने जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. वाढणाऱ्या महागाईमुळे गरीब, मध्यमवर्गीयांचे हाल हाेत आहेत. नाेव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सिलिंडरचे दर अनुक्रमे ६०५, ६५५, ७०५ आणि ७३० रुपये असल्याचे दिसते. नाेव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तब्बल १२५ रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट हाेते.
पेट्राेलचे दर हे नाेव्हेंबर ८७.९४ रुपये प्रतिलीटर, डिसेंबर ८९.१७ रुपये प्रतिलीटर, जानेवारी ९०.४९ रुपये प्रतिलीटर आणि फेब्रुवारी ९३.०१ रुपये प्रतिलीटर त्याचप्रमाणे डिझेलचे दर हे नाेव्हेंबर ७५.८७ रुपये प्रतिलीटर, डिसेंबर ७७.९१ रुपये प्रतिलीटर, जानेवारी ७९.४२ रुपये प्रतिलीटरआणि फेब्रुवारीमध्ये डिझेल प्रतिलीटर ८२.१६ रुपये झाले आहे. पेट्राेलच्या दरात पाच रुपये, तर डिझेलच्या दरात सहा रुपये २९ पैशांनी वाढ झाली आहे.
पेट्राेल, डिझेलसह सिलिंडरचेही दर चांगलेच वाढले आहेत. याच माेदी सरकारमधील आताचे मंत्री दरवाढीविराेधात आधीच्या सरकार विराेधात रान उठवले हाेते. किमती वाढल्याने किराणामाल, भाजीपाला यांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्यांचे धाेरण दुटप्पी आहे.
- दत्ता ढवळे
सरकारने अर्थसंकल्प सादर केला खरा मात्र सीतारमन यांच्या पाेतडीतून सर्वसामान्यांसाठी काहीच निघाले नाही. उलट या सरकराने इंधनावर अधिभार लावण्याचे ठरवले आहे. म्हणजे आता पेट्राेल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरामध्ये आणखीन वाढ हाेणार आहे. याचाच अर्थ महागाई अजून वर डाेके काढणार.
- दीपक म्हात्रे
सरकारने इंधनाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे आपाेआपच सर्वच महागणार आहे. किराणा, भाजीपाला यांचेही दर वाढणार आहेत. त्यामुळे किचन बजेटवर त्याचा विपरीत परिणाम हाेणार आहे. सरकारने किमती कमी करू, असे आश्वासन दिले हाेते. मात्र सरकार आता ते आश्वासन पाळताना दिसत नाही.
- नेहा पाटील