केंबुर्ली गावाजवळ गंधकाने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:01 PM2019-07-21T23:01:41+5:302019-07-21T23:01:56+5:30

महिन्याभरापूर्वी ट्रक उलटला : पोलीस प्रशासनाची तारांबळ

Stomach taken by sulfur near Kemburli village | केंबुर्ली गावाजवळ गंधकाने घेतला पेट

केंबुर्ली गावाजवळ गंधकाने घेतला पेट

Next

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ रसायन घेऊन जाणारा ट्रक जून महिन्यात पलटी झाला होता. यातील गंधकाची पावडर रस्त्यालगत अपघातामुळे पसरली गेली. या घटनेला आता महिना झाला असला तरी अद्याप हे गंधक काढण्यात आले नव्हते. गंधक पावडरला रविवारी अचानक आग लागली. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. नदी आणि महामार्गाच्या मध्ये पडलेल्या या गंधक पावडरकडे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले.

केंबुर्ली गावाजवळ २२ जून रोजी रात्री १० च्या सुमारास एक ट्रक पलटी झाला होता, यामध्ये दोन जण जखमी झाले होते तर ट्रकमधील गंधकही पसरले होते. आता या घटनेला एक महिना होत आला तरीदेखील संबंधित ट्रकमालक, कंपनी आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या ठिकाणी पडलेला ट्रक केवळ उचलून नेण्यात आला. मात्र, पिवळ्या रंगाचे गंधक तिथेच पडून राहिले. इंडस्ट्री वापरासाठी असलेल्या या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने रविवारी या गंधकाने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून पोलिसांना समजताच पोलिसांची तारांबळ उडाली. नदी आणि महामार्ग यादरम्यान पडलेल्या गंधकाने नदीलादेखील धोका निर्माण होऊ शकत होता. या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

रविवारी सकाळी पडलेले गंधक धुमसू लागले आणि कालांतराने या गंधकाने पेट घेतला. त्यानंतर पोलिसांकडून महाड एम.आय.डी.सी.च्या अग्निशमन पथकाचे बंब मागवण्यात आले. मात्र, पाण्याशी संपर्क आल्याने या गंधकाने अधिकच पेट घेतला. यामुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. अखेर महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार कंपनीकडून माती मागवण्यात आली आणि ही माती वरून टाकण्यात आली, यामुळे गंधकाला लागलेली आग आटोक्यात आली. घटनास्थळी नायब तहसीलदार अरविंद घेमुड हेदेखील दाखल झाले.

पोलीस प्रशासनाची डोळेझाक
जून महिन्यातील २२ तारखेला हा अपघात झाला होता. या अपघातात ट्रक पलटी झाला, तर दोन जण जखमी झाले होते. या ठिकाणाहून ट्रक काढण्यात आला. मात्र, ज्या कंपनीचा माल होता त्याने मात्र हा माल येथून काढून नेला नाही. पोलीस प्रशासनानेही या कंपनीला बजावले नाही. यामुळे गंधकासारखे रसायन गावाशेजारी पडून राहिले. या गंधकाचा धोका जनावरे आणि लहान मुलांना असतानाही याबाबत बेजबाबदारी पोलीस प्रशासनाने दाखवली. या गंधकाबाबत आजही अनभिज्ञता आहे.

Web Title: Stomach taken by sulfur near Kemburli village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.