कडकडीत बंद, मुंबई-गोवा महामार्ग तीन तास रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:06 AM2018-08-10T02:06:43+5:302018-08-10T02:06:54+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

Stop the Mumbai-Goa highway for three hours in Kadkadit | कडकडीत बंद, मुंबई-गोवा महामार्ग तीन तास रोखला

कडकडीत बंद, मुंबई-गोवा महामार्ग तीन तास रोखला

Next

अलिबाग : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये पाळण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आंदोलकांनी तब्बल तीन तास रोखून धरली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. आंदोलकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे (जुना महामार्ग) रोखून धरल्याने तोही ठप्प झाला होता. एसटी बसेसच्या ९९ टक्के फेऱ्याही रद्द केल्याने आर्थिक नुकसानीसह प्रवाशांचे हाल झाले.
रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे (जुना महामार्ग) आणि मुंबई-गोवा हे महत्त्वाचे महामार्ग जातात. हे महामार्ग सातत्याने अतिशय व्यस्थ असणारे महामार्ग आहेत. पुण्यातूनच सुरुवात होऊन मुंबईकडे येणारे मार्ग आंदोलकांनी रोखले होते. त्यामुळे हे दोन्ही मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा या महामार्गावरील वाहतूक माणगाव आणि महाड येथे आंदोलकांनी तीन तास अडवल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. काहीच दिवसांपूर्वी नवी मुंबईमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलक आणि पोलीस एकमेकांबरोबर भिडले होते.गुरुवारी रस्त्यांवर एसटी बसेस अजिबात दिसून आल्या नाहीत, तसेच खासगी वाहनेही धावताना दिसली नाहीत. मालवाहू ट्रक, टेम्पोची तुरळक वाहने असल्याने वाहतूककोंडी झाली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.
आंदोलनामुळे अलिबागमधील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता. शाळांनाही सुट्टी जाहीर केल्याने त्याही बंद होत्या. बंदचा फटका एसटीलाही बसला. रायगड जिल्ह्यातील विविध आगारातून सुमारे ९ फेºया झाल्याने ९९ टक्के एसटीची चाके थांबली होती. एकट्या अलिबाग एसटी आगारातून नियमित सुटणाºया १९१ फेºया रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. आंदोलनामुळे जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे सुमारे ४५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पेण येथील आगार विभागाने दिली. विक्रम मिनीडोर, आॅटो रिक्षा याही रस्त्यावर धावताना दिसल्या नाहीत. मराठा समाजाने जिल्ह्याच्या विविध ठिकाणी शांततेमध्ये आंदोलने केली. अलिबाग शहरामध्ये त्यांनी मोर्चा काढला. सरखेल कान्होजी राजे आंग्रे (आरसीएफ गेट) यांच्या पुतळ््यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा शहरात दाखल झाल्यावर त्याला भव्य रूप आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हिराकोट तलाव परिसरामध्ये पोलिसांनी मोर्चाला रोखले. त्यानंतर जोरदार घोषणा देत सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला. मराठा समाजातील तरुणींनी आंदोलकांपुढे आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाºयांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
>रेवदंडा बाजारपेठेतील व्यवहार ठप्प
रेवदंडा : रेवदंड्यात व्यापारीवर्गाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद पाळला. बाजारपेठ बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील आलेल्या ग्रामस्थांना निराशेने घरी परतावे लागले. डाकघर, बँका उघडल्या होत्या, परंतु तेथेही व्यवहार करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ विशेष नव्हती. ग्रामीण भागातून काही महिला भाजी विक्रीसाठी आलेल्या दिसत होत्या. रिक्षा सुरू होत्या. एसटी सकाळी दहापर्यंत ये-जा करताना दिसल्या. विद्यालये सुरू असली तरी विद्यार्थी संख्या तुरळक होती.
>शिस्तबद्ध, संयमी मोर्चा
श्रीवर्धन : श्रीवर्धनमध्ये सोमजाई मंदिर ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढला आहे. मोर्चाप्रसंगी श्रीवर्धन शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चेकºयांनी आपले निवेदन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना सादर केले.
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्याचा एकत्र मोर्चा काढण्यात आला. श्रीवर्धन शहरात मराठा समाजाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्वत्र बंद पाळण्यात आला.एसटी महामंडळाची एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही त्यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. माध्यमिक शाळा सुरू होत्या, परंतु वाहतुकीच्या साधनाअभावी विद्यार्थी शाळेत पोहचू शकले नाहीत.
>शाळा, कॉलेज बंद
नागोठणे : नागोठणे शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारी कर्मचाºयांच्या संपामुळे अगोदरच सर्व कार्यालये बंद आहेत, त्यात मराठा क्र ांती ठोक मोर्चा आंदोलनामुळे नागोठणे शहरातील सर्व बाजारपेठ, शाळा, कॉलेज बंद होती. एसटी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
>माणगावात चालक त्रस्त
माणगाव : तालुक्यातील आसपासच्या गावातून मराठा समाज एकत्र येऊन मुंबई-गोवा व माणगाव-पुणे मार्ग सुमारे दोन तास रोखून ठेवला. यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागला. संपूर्ण माणगावात कडकडीत बंद ठेवण्यात आला. गोरेगाव, निजामपूर, इंदापूर, लोणेरे येथे सर्व व्यापारी वर्गाने बंदला १०० टक्के प्रतिसाद दिला, सरकारी रु ग्णालये व मेडिकल अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.
>म्हसळ्यात तहसील कार्यालयावर मोर्चा
म्हसळा : म्हसळ्यात मराठा समाजाने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून संपूर्ण शहरात मोर्चा काढला. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा इशारा त्यावेळेस मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. शहरात मोर्चा काढण्यात आला असला तरी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत होते. तालुक्यातील महामंडळाची बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. शहरातील व ग्रामीण भागातील अनेक शाळांना तसेच विद्यालयांना सुटी देण्यात आली होती. श्रीवर्धन आगारातून राज्य परिवहन मंडळाची एकही बस बंदच्या पार्श्वभूमीवर न सोडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे पाहावयास मिळत होते.

Web Title: Stop the Mumbai-Goa highway for three hours in Kadkadit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.