नांदेड-पनवेल गाडीला कर्जतला थांबा द्यावा
By admin | Published: February 16, 2017 02:09 AM2017-02-16T02:09:12+5:302017-02-16T02:09:12+5:30
काही दिवसांपूर्वी हुजूर साहेब नांदेड - पनवेल अशी विशेष त्रैसाप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली होती. ही विशेष गाडी १६ आॅक्टोबर
कर्जत : काही दिवसांपूर्वी हुजूर साहेब नांदेड - पनवेल अशी विशेष त्रैसाप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली होती. ही विशेष गाडी १६ आॅक्टोबर, २०१६ ते ३१ जानेवारी, २०१७ या कालावधीकरिता सुरू करण्यात आली होती. मात्र, ही गाडी फक्त एक दिवस सोडून, रोजच सुरू करण्यात आली आहे. या गाडीला नांदेडहून पनवेलला जाताना कर्जतला थांबा न दिल्यामुळे रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्याय करीत असल्याचे मत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी व्यक्त केले आहे.
नांदेडहून पनवेलला जाताना ही गाडी कर्जतला सकाळी साधारण ८.३०च्या सुमारास येते, त्यामुळे कर्जतहून पनवेलला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूपच सोईची आहे. या गाडीला कर्जतमध्ये थांबा दिल्यास कर्जतकरच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. सध्या याच वेळेदरम्यान कर्जतहून पनवेलला जाण्याकरिता एकही गाडी नसल्यामुळे कर्जतकर प्रवासी बसने किंवा रिक्षाने जात असतात. सकाळी ८.३०च्या दरम्यान कर्जतहून पनवेलला जाण्याकरिता एकही गाडी नसल्याने नाईलाजाने कर्जतकरांना पनवेलला बसनेच जावे लागते.नांदेड-पनवेल ही गाडी रोजच केल्यामुळे कर्जतकर खूश झाले. मात्र, गाडीचा थांबा कर्जतला नसल्याने कर्जतकरांच्या आनंदावर विरजन पडले. त्यामुळे गाडीला कर्जत रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.
ही गाडी पनवेलला सकाळी ९ वाजता पोहोचल्यानंतर दुपारी ४ वाजता ती गाडी परत नांदेडला रवाना होते. म्हणजे जवळ जवळ सात तास गाडी पनवेललाच उभी असते. यामुळे या गाडीला कर्जतला थांबविल्यास कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा गाडीला उशीर होणार नाही. तसेच या गाडीचा थांबा कर्जतला दिल्याने त्याचा फायदा फक्त कर्जत पुरताच मर्यादित न राहता तो कर्जत ते सीएसटीपर्यंत सगळ्याच प्रवाशांना होणार आहे. कारण, ही गाडी पनवेलपर्यंतच असल्याने ज्या प्रवाशांना नेरळ, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, दादर म्हणजेच सीएसटीपर्यंत जाण्यासाठी तिचाउपयोग होणार आहे. ही गाडी नांदेडहून शनिवारी सोडून रोजच संध्याकाळी ५.३० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पनवेलला ९ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी पनवेलहून रविवारी सोडून रोजच दुपारी ४ वाजता सुटणार आहे. (वार्ताहर)