रेवदंडा : मुरुड-जंजिरा तालुक्यातील साळावमधील जे.एस.डब्ल्यू. प्रकल्पातील अवजड माल वाहतुकीने रेवदंडा बाह्यवळण मार्ग खचला आहे. यामुळे वावे मार्गे अलिबागपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून ही अवजड वाहतूक या रस्त्यावरून बंद करावी, तसेच खड्डे तत्काळ भरावेत या मागणीसाठी सोमवारी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते.अलिबाग तालुक्यातील चौल चौकी येथे अलिबाग व मुरु ड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सुमारे एक ते दोन फूट खड्डे पडल्याने या रस्त्यावर पाण्याची डबकी तयार झाली आहेत. यामुळे सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. पादचारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेवदंडा बाजारपेठेत पंचक्र ोशीतील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी यावे लागते तर विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते. सद्यस्थितीत अनेक पालक या रस्त्यावर पडलेले खड्डे पाहता शाळेत मुलांना पाठवणे बंद केले आहे.मुरुड-जंजिरा तालुक्यातील साळावमधील जे.एस.डब्ल्यू. प्रकल्पातील अवजड वाहतुकीने हा रस्ता खचल्याचे अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता अलिबाग व प्रकल्पातील अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु दोघांनी दुर्लक्ष केल्याने आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. आंदोलनाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता न येता त्यांनी कनिष्ठ अभियंता यांना पाठवल्याने शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पातील वरिष्ठ अधिकारी भानू प्रसाद यांनी प्रकल्पातर्फे सोमवारपासून खड्डे चांगल्या दर्जाचे मटेरियल टाकू न भरण्यात येतील असे आश्वासन दिले. हे काम सुप्रभात कंपनीला देण्यात आले असले तरी प्रकल्पाचे त्यावर लक्ष राहील असे सांगण्यात आले. स्थानिक तहसीलदार, पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या रस्त्यावर ग्रामस्थांना कशा प्रकारे प्रवास करावा लागत आहे यासाठी अलिबागवरून आलेल्या अभियंत्यांना खड्ड्यांतून चालायला लावले.
चौल चौकी येथे शिवसेनेचे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:54 AM