महाडमध्ये काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको

By admin | Published: August 20, 2016 12:44 AM2016-08-20T00:44:47+5:302016-08-20T00:44:47+5:30

प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा

Stop the road to the Congress highway in Mahad | महाडमध्ये काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको

महाडमध्ये काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको

Next

महाड : प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी दिला. मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी आंदोलकांसमोर झालेल्या भाषणात जगताप बोलत होते.
या आंदोलनात सुमारे तीन हजारांहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. आंदोलकांनी दीड तास महामार्ग रोखून धरल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माणिक जगताप म्हणाले की, मुंबईतील बहुतांश आमदार हे कोकणातीलच आहेत. राज्याच्या सत्तेत कोकणाचे योगदान महत्वाचे असले तरी आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कोकणाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे, राज्यातील जवळजवळ सर्व महामार्गांचे चौपदरीकरण होते, मात्र शंभर वर्षांपूर्वीच्या या मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मात्र पूर्ण होऊ शकत नाही. हे कोकणी माणसाचे दुर्दैव असल्याचे सांगून जगताप यांनी शासनाच्या बांधकाम विभागावर जोरदार टीका केली. कोकणातील मुंबईत राहणारे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते यांनी देखील फोन करुन, आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितल्याचे जगताप यांनी स्पष्ट के ले. शिवसैनिक म्हणून आम्हाला सांगायला लाज वाटते असेही ते शरमेने सांगतात. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून कोकणवासीयांची ही उपेक्षा कधी थांबणार, असा सवालही जगताप यांनी यावेळी केला.
खा. हुसेन दलवाई यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर टीका केली. रायगडवासीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या या पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी दलवाई यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई सफर करण्यापेक्षा पनवेल ते सावंतवाडी महामार्गाने प्रवास करण्याची हिंमत दाखवावी असे आव्हानही के ले. यावेळी श्याम म्हात्रे, विश्वनाथ पाटील, रमेश वैष्णव यांचीही भाषणे झाली. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई, माजी आ. मुश्ताक अंतुले, माजी आ. मधुकर ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, प्रदेश सरचिटणीस बाळकृष्ण पूर्णेकर, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, श्याम म्हात्रे, कुणबी समाजाचे कोकणचे नेते विश्वनाथ पाटील आदी नेते उपस्थित होते. (वार्ताहर)

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे खड्डे भरावेत, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करून ते दीड वर्षात पूर्ण करावे आदी प्रमुख मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. आंदोलनाप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. डीवायएसपी प्रांजली सोनावणे, माणगांव डीवायएसपी दत्ता नलावडे आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Stop the road to the Congress highway in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.