वडखळ : राज्यामध्ये १९७२ पेक्षाही दुष्काळाचे भयाण स्वरूप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सरकारची शेतक ऱ्यांबाबत असलेली अनास्था, तसेच गणेशोत्सव जवळ आला असताना सरकारने मुंबई- गोवा महामार्गाकडे केलेले दुर्लक्ष तसेच महामार्गाचे चौपदरीकरणाचे अतिशय मंद गतीने सुरु असलेले काम, पनवेल -पोलादपूर या महामार्गावरील खड्डे, येथून होणारी अवजड वाहनांची वाहतूक व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, वाढते अपघात आदी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वडखळ नाका येथे राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वडखळ नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनामुळे वडखळ नाक्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. माजी मंत्री सचिन अहिर म्हणाले की, युतीच्या सरकारने राज्यातील सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरावेत, महामार्गाचे काम जलदगतीने सुरु करावेत, अन्यथा रायगडमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला सचिन अहिर यांनी दिला. या वेळी आ. अवधूत तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुंबई - गोवा महामार्गावर रास्ता रोको केल्यावर पोलिसांनी आ. सचिन अहिर, आ. अवधूत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केली व नंतर सोडून दिले.(वार्ताहर)
वडखळ नाक्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2015 11:29 PM