शोधमोहिमेला पूर्णविराम! मंत्री उदय सामंत यांची माहिती; इर्शाळवाडीत २७ मृतदेह लागले हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 05:34 AM2023-07-24T05:34:38+5:302023-07-24T05:35:17+5:30

५७ जण बेपत्ता . रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळून अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

Stop the search! Information from Minister Uday Samant; 27 dead bodies were found in Irshalwadi | शोधमोहिमेला पूर्णविराम! मंत्री उदय सामंत यांची माहिती; इर्शाळवाडीत २७ मृतदेह लागले हाती

शोधमोहिमेला पूर्णविराम! मंत्री उदय सामंत यांची माहिती; इर्शाळवाडीत २७ मृतदेह लागले हाती

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळून अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यानंतर तीन दिवस प्रशासनातर्फे तेथे बचावकार्य सुरू होते. ही शोधमोहीम रविवारी साडेपाच वाजता थांबविण्यात आली आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून २७ मृतदेह बाहेर काढले असून, ५७ जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता ग्रामस्थांना मृत घोषित करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. तळिये येथील दुर्घटनेवेळी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारला पाठवावा लागणार आहे. 

रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी इर्शाळवाडी येथील दुर्घटनास्थळी भेट देत खालापूर पोलिस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून शोध व बचाव मोहीम थांबवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी आ. महेश बालदी, आ. महेंद्र थोरवे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विशेष पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बढे, एनडीआरएफ कंमाडर तिवारी उपस्थित होते.

सिडकोमार्फत जागेचा विकास

संबंधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडकोमार्फत या जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ. महेश बालदी यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार ५ वाड्यांचे आणि जिल्ह्यातील २० धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

एक हजार लोकांमार्फत बचावकार्य

दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी असे एकूण जवळपास १ हजार १०० लोकांनी चांगले काम केले, त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून शासन खबरदारी घेईन, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

हजारांवर गावे दरडीच्या सावटाखाली !

कोकण विभागातील २० टक्क्याहून अधिक  म्हणजे तब्बल १,०५० गावे   दरडप्रवण क्षेत्रात आहेत. ‘दुसरी इर्शाळवाडी’ घडण्यापूर्वी संबंधित गावातील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करणे गरजेचे आहे. 

इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने आदिवासी वाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. इर्शाळवाडीतील लोकसंख्या २२८ इतकी होती. यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्युमुखी पडले. ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.
- उदय सामंत, पालकमंत्री, रायगड

पुनर्वसन लवकरच करण्याचे आश्वासन 

या दुर्घटनेतून वाचलेल्या १४४ जणांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून पाच आदिवासी वाड्यांचे पुनर्वसन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Stop the search! Information from Minister Uday Samant; 27 dead bodies were found in Irshalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.