चारही बंदरांचे कामकाज थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:54 AM2018-05-12T04:54:50+5:302018-05-12T04:54:50+5:30
जेएनपीटीच्या डीपीडी धोरणाविरोधात बुधवारपासून वाहतूकदारांनी सुरू केलेले असहकार आंदोलन सुरूच असल्याने जेएनपीटीअंतर्गत असलेल्या चारही बंदरांतील कामकाज थंडावले आहे.
उरण : जेएनपीटीच्या डीपीडी धोरणाविरोधात बुधवारपासून वाहतूकदारांनी सुरू केलेले असहकार आंदोलन सुरूच असल्याने जेएनपीटीअंतर्गत असलेल्या चारही बंदरांतील कामकाज थंडावले आहे. मालवाहू जहाजांवरील होणारी चढ-उतार वगळता चारही बंदरांत गुरुवारी (१० मे) एकही कंटेनरची वाहतूक झाली नाही. यामुळे बंदराच्या कामकाजावरही मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. रस्ता मार्गे होणारी वाहतूकच ठप्प झाल्याने मात्र जेएनपीटी परिसरातील रस्ते सुनसान होते.
जेएनपीटीने डीपीडी धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असतानाच चारही बंदरांतून कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या राज्यातील विविध संघटनांच्या वाहतूकदारांनी बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारपासूनच चारही बंदरांत कंटेनरची वाहतूक ठप्प झाली आहे.
जेएनपीटीने अवलंबिलेल्या डीपीडी धोरणाविरोधात असहकार सुरू करणाºया वाहतूकदारांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी डीसीपी डॉ. राजेंद्र माने यांनी पुढाकार घेतला. मात्र वाहतूकदार आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघाला नव्हता. वाहतूकदारांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत जेएनपीटी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा वाहतूकदारांना होती. मात्र जेएनपीटी अध्यक्षांऐवजी दुय्यम अधिकाºयांशी चर्चा करण्यास वाहतूकदार तयार नाहीत. त्याशिवाय याबाबत जेएनपीटी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनीही आंदोलक वाहतूकदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधला नाही. त्यामुळे जेएनपीटीलाच आंदोलकांशी चर्चा करण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे जेएनपीटीशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्टÑ हेवी व्हेईकल इंटरस्टेट ओनर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी व्यक्त केली.
जेएनपीटीची अशीच ताठर भूमिका कायम राहिल्यास आंदोलन मागे घेण्याबाबत निश्चित तोडगा निघेल याबाबत पैठणकर यांनी शंका व्यक्त केली.