महाड : गाड्यांची दयनीय अवस्था, खासगी वाहतुकीकडे दुर्लक्ष, आगारातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही विभागीय नियंत्रक व महाड एसटी आगार व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महाड एसटी आगारातील कामगार संघटनेच्या कामगारांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे मंगळवारी दिवसभराच्या महाड आगारातून सुटणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसह शासकीय कर्मचाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. महाड आगाराच्या या गलथान कारभाराबद्दल आगारातील कर्मचारी व प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष असून आगारातील विविध समस्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही व्यवस्थापनाकडून त्याची गंभीर दखल घेतली नसल्याने दुर्दैवाने हे काम बंद आंदोलनाचे हत्यार कामगारांना उपसावे लागल्याचे दिसून आले. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हे मध्यवर्ती आगार असून गेल्या तीन-चार वर्षांपासून या आगाराचे व्यवस्थापन पूर्णपणे डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे. १२ डिसेंबर २०१६ रोजी महाड आगाराच्या विविध समस्यांबाबतचे निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आले होते. १५ दिवसांत या समस्यांबाबत तोडगा न निघाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे महाड आगाराचे अध्यक्ष एस. एम. गोडबोले आणि सचिव कैलास देशमुख यांनी निवेदनात दिला होता. मात्र याबाबत विभाग नियंत्रक व महाड आगार व्यवस्थापनाने कुठलीही दखल घेतली नाही.करारात मान्य केल्यानुसार दर दोन महिन्यांनी संयुक्त विचार विनिमय बैठक होणे अपेक्षित असतानाही या बैठका घेण्यात येत नाहीत. वारंवार पत्रव्यवहार करूनही टीटीएस, डीडब्लूएस, वाहक, चालक यांचे आठवडा सुुटी रद्द न करणे, महाड आगारातील गाड्यांच्या दयनीय अवस्था, स्पेअर पार्ट्स उपलब्ध नसणे, गाड्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश, करार कायद्याचा भंग करून अनियमित निर्णय घेतले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आदी प्रमुख मागण्यांकडे एसटी कामगार संघटनेने व्यवस्थापनाचे लक्ष वेधले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आगार व्यवस्थापनाच्या विरोधात हे काम बंद आंदोलन छेडावे लागल्याचे कामगार संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. (वार्ताहर)
एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन
By admin | Published: December 28, 2016 3:54 AM