वादळाचा म्हसळ्यातील शाळा, अंगणवाड्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:17 AM2020-06-13T00:17:17+5:302020-06-13T00:18:08+5:30
निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या म्हसळा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
उदय कळस ।
म्हसळा : निसर्ग चक्रीवादळात म्हसळा तालुक्यातील शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीची कौले, पत्रे उडाले, भिंती पडल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानात पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यत नुकसान झाले असून तालुक्यातील सुमारे ११० प्राथमिक शाळा, १०० माध्यमिक शाळा, ८० अंगणवाड्या आणि महाविद्यालये यांची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या म्हसळा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्याने अनेक शाळांच्या इमारतींचे पत्रे, कौले फुटली असून भिंती खचल्या आहेत. परिसरातील झाडे इमारतींवर पडल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. कमीत कमी ५० ते ६० हजारांपासून ४० ते ५० लाखांचे प्रत्येक इमारतीचे नुकसान झाले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना कोणत्या प्रकारे सुरू करावे, इमारतीच्याा डागडुजीचे काय? सरकरी मदत कशा प्रकारे मिळेल? इमारत दुरुस्तीपर्यंत शाळांचे काय, असे अनेक प्रश्न शाळा व्यवस्थापनास पडले आहेत. वादळाच्या ताडाख्याचा परिणाम शाळांच्या भौतिक सुविधांवर पडला असून देणगीतून निधी जमा करून उभारलेल्या सुसज्ज शाळांचे झालेले नुकसान पाहून नागरिक, पालक चिंता व्यक्त करीत आहेत.
शाळांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष तसेच सोलार सिस्टीम यांचे नुकसान होऊन हीच रक्कम २ ते ४ लाखांच्या घरात जाते. त्यामुळे या नुकसानीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शिक्षणप्रेमी करीत आहेत. निसर्ग वादळाने शाळेच्या भौतिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगराळ असल्याने वीज आणि मोबाइल सेवा विस्कळीत झाल्याने त्यांचा जगाशी संपर्क तुटल्यामुळे अडचणींमध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे.