मराठ्यांचे वादळ पनवेलमध्ये धडकणार; लाखो लोकांच्या जेवणाची तयारी
By वैभव गायकर | Published: January 24, 2024 04:04 PM2024-01-24T16:04:02+5:302024-01-24T16:05:31+5:30
या पदयात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संखेने मराठा बांधव पनवेलमध्ये एकवटणार आहे.
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेलः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी ते आझाद मैदान पर्यंत 409 किमी पदयात्रा काढली आहे. गुरुवारी दि. 25 रोजी हि पदयात्रा सकाळी 10 च्या सुमारास पनवेल मध्ये धडकणार आहे.या पदयात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संखेने मराठा बांधव पनवेलमध्ये एकवटणार आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले आहे.या लढ्यात जरांगे यांनी शासनाला अनेक अल्टिमेटम देखील दिले.मात्र शासन आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असल्याने जरांगे यांनी पदयात्रा काढत शासनाला जागे करण्याचा शेवटचा प्रयत्न सुरु केला आहे.आंतरवली सराटी ते मुंबईतील आझाद मैदान पर्यंत पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेत लाखोंच्या संखेने मराठा समाज सामील झाला आहे. बुधवारी लोणावळा येथे मुक्काम करून गुरुवारी सकाळी पदयात्रा पनवेलच्या दिशेने कूच करणार आहे.पदयात्रेत सामील आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था कळंबोली ते बेलापुर पर्यंतच्या मार्गावर स्टॉल मांडून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त लोक येण्याची शक्यता आहे.या सर्व लोकांच्या दुपारच्या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पनवेल तालुक्यातील मराठा कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मुस्लिम,शीख समाजाच्या वतीने यावेळी अन्न पदार्थांचे वाटप केले जाणार आहे.पदयात्रा रात्री मुक्कामी वाशी येथे थांबणार आहे. दुसऱ्या दिवशी चेंबूर मार्गे आझाद मैदानाकडे मार्गस्थ होणार आहे.
सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.पदयात्रेचे पनवेल तालुक्यात जंगी स्वागत आम्ही करणार आहोत.यावेळी लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुस्लिम,शीख समाजाने अन्नदानासाठी हात पुढे केला आहे. -रामदास शेवाळे(समन्वयक सकल मराठा समाजक)