दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे व कौलारू छप्पर गुरुवारी वादळात उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वा-यामुळे ही घटना घडली असून दुपारच्या सुट्टीमुळे शाळेतील विद्यार्थी बालंबाल बचावले. शाळेला वाळवी लागली असून ती धोकादायक बनली असून दुरुस्तीची मागणी गेल्या सात वर्षांपासून पालक तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. सत्तर पटसंख्या असणाºया शाळेत चार खोल्या आहेत. गुरुवारी सुटलेल्या वादळी वाºयाने शाळेच्या चार पैकी तीन खोल्यांचे पत्रे व कौलारू छप्पर उडाले. यामध्ये डिजिटल रूमची प्लॅस्टिक शेड फाटल्याने डिजिटल शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले आहे. दुपारी दीडच्या सुमारास शाळेला जेवणाची सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्गात नव्हते. त्यामुळे थोडक्यात बचावले. मात्र या घटनेत शाळेचे संपूर्ण पत्रे व भिंतीची नासधूस झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना सध्या एका वर्गखोली बसवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून करण्यात येत आहे.वाळवी लागल्याने आदगाव शाळा धोकादायक बनली आहे. छपरामधील पूर्ण लाकूड वाळवीने बाधित आहे. त्यामुळे पावसाळ्यात कायम गळकी असते. त्यामुळे वर्गखोल्या तसेच डिजिटल शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा केव्हाही कोसळण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे.आदगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी शिक्षणविभागाकडे शाळा कमिटी २०१३ पासून मागणी करीत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आजतागायत शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी अशा दुर्घटनेला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या छताची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी उपसरपंच देवेंद्र मोरे सोबत ग्रामस्थ करत आहे.सर्वशिक्षण अभियानाने कार्यकारी अभियंत्यांनी अंदाजे खर्चपत्रक (इस्टिमेट) तयार केले आहे. ते मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे लवकरात लवकर सादर करून दुरुस्तीचे काम करण्यात येईल.- वाय. एन. प्रभे,गटविकास अधिकारीशिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही शाळा दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे अशा दुर्घटनेचा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल-दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत आहे.- सुदेश मोरे, माजी व्यवस्थापकशाळा समिती अध्यक्ष, आदगाव.
वादळी वाऱ्यामुळे आदगाव शाळेचे छप्पर उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:46 AM