रायगडमध्ये सात तालुक्यांना वादळाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 11:22 PM2020-06-02T23:22:12+5:302020-06-02T23:25:04+5:30
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यातील समुद्र, खाडीकिनाऱ्यालगतच्या गावांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. ताशी १०० ते १२० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे वादळाची तीव्रता भयंकर रूप धारण करण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगडमधील सात तालुक्यांना या वादळाचा फटका बसण्याची शक्यता असून समुद्र आणि खाडी किनाºयालगतच्या गावांमधील नागरिकांना मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. निसर्ग असे या आपत्तीला नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या दिशेने हे वादळ सरकत असतानाच अचानक ते अलिबागला धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ४ जूनपर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व रोहा या सात तालुक्यांतील किनाºयालगतच्या गावांमधील नागरिकांना मंगळवारी २ जून रात्री १२ वाजल्यापासून ३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५ हजार ६६८ मच्छीमारांना परत बोलावून घेण्यात आले आहे. वादळी परिस्थिती लक्षात घेऊन वीजपुरवठा बंद करण्याची शक्यता आहे अशी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
वादळाचा अलिबागला फटका
बसण्याची शक्यता कमी - राजाराम भगत
आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध आपत्तीचा तडाखा जिल्ह्यातील अन्य भागांना बसला आहे. मात्र अद्यापही चक्रीवादळाचा अथवा त्सुनामीचाही धक्का अलिबागला लागला नव्हता. येथील वयोवृध्द कोळी समाजातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अलिबागही रामभूमी (रामखंड) आहे. श्रीराम जेंव्हा सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेला निघाले होते. तेंव्हा काही कालावधीसाठी त्यांनी अलिबाग कुरुळ (उंडिचाभाट) येथे विश्रांती घेतली होती. अलिबागच्या समुद्र किनारपट्टीचा आकार हा रामाच्या धुनष्याप्रमाणे आहे.
त्यामुळे चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला नाही, असे राजाराम भगत यांनी लोकमतला सांगितले. त्याचप्रमाणे सूर्यादयाच्या वेळी पश्चिमेला किंवा सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेला आकाशामध्ये अर्ध्या आकाराचे इंद्रधनुष्य दिसते. ते अद्याप दिसलेले नाही. त्यामुळे वादळाचा धोका पोचण्याची शक्यता कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. समुद्र किनाºयातील वाळूमधील खेकड्यांनी वाळूमध्ये खोलवर होल करुन घरे केली आणि त्या होलमधून पाण्याचे मोठे फुगे तयार झाल्यास वादळाची तिव्रता अधिक असते असेही त्यांनी सांगितले.
पहिल्याच पावसात वीज वितरण कोलमडले
कळंबोली : जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पनवेल परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. मंगळवारी पाच वाजता वाºयासह पावसाला सुरुवात झाली. वाºयामुळे पनवेल परिसरात दोन तास बत्ती गुल झाल्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला. अवघ्या काही मिनिटाच्या पावसात बत्ती गुल झाल्याने महावितरणचे आपत्ती व्यवस्थापन फोल ठरल्याने दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसापासून तापमाणाचा पारा वाढत असतानाच सोमवारपासून पनवेल परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरवर्षी ७ जूनला पावसाचे आगमन होते. मात्र यंदा जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली. मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. यात पनवेल परिसरासह खांदा वसाहत, विचूंबे परिसरातील बत्ती गुल झाली.
यामुळे लॉकडाउनमध्ये वर्क फॉम होम करणाऱ्यांची पंचाईत झाली. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोबाईल , लॅपटॉप बंद पडून कामात खोळंबा झाला. वास्तविक, पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे, वेळोवेळी शटडाऊन घेण्यात आले आहे. मात्र पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने महावितरणचे आपत्ती व्यवस्थापन फोल ठरले आहे.