श्रीवर्धन एसटी स्थानकात वादळग्रस्तांनी थाटला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:45 PM2020-06-10T23:45:51+5:302020-06-10T23:46:17+5:30
प्रशासन करतेय मदत : मेंटकर्णी भागातील घरांचे नुकसान
संतोष सापते
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुका बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू होता. जवळपास १२० च्या वेगाने वाहणारे वारे व पाऊस याने श्रीवर्धन तालुका उद्ध्वस्त करून टाकला आहे. श्रीवर्धन एसटी स्थानकालगत असलेल्या मेंटकर्णी भागातील अनेक घरे चक्रीवादळात उद्ध्वस्त झाली आहेत. घरांची पडझड झालेल्या नागरिकांना श्रीवर्धन एसटी स्थानकात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
चक्रीवादळाने घराचे पत्रे, कौलारू छत, भिंती व घरातील जीवनावश्यक वस्तू यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अन्नधान्य, टीव्ही, कपडे व घरातील इतर साहित्य पाण्याने भिजून खराब झाले आहे. वादळाने घरांचे अतोनात नुकसान झाल्याने घरांत राहणे धोकादायक ठरत आहे. अशा कठीण प्रसंगी मेंटकर्णीमधील जवळपास ६० नागरिकांनी एसटी स्थानकात निवाऱ्यासाठी आश्रय घेतला आहे. मेंटकर्णी हा श्रीवर्धनमधील सर्वसामान्य मजूर, हातावर पोट भरणाºया लोकांचा परिसर आहे. कच्ची मातीची, कौलाची व थोड्या प्रमाणात सिमेंटची अशी सुमारे २५० घरे मेंटकर्णी परिसरात आहेत. मेंटकर्णी स्थित लोकसंख्या ९५० च्या जवळपास आहे. बुधवारी वादळ झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय १८०, गवळी समाज हॉल २०, मातोश्री हॉटेल २० व श्रीवर्धन एसटी स्थानकांत ६० नागरिकांनी आश्रय घेतल्याचे आराठी ग्रामपंचायत सदस्य मुजफर शेख यांनी सांगितले. सद्य:स्थितीत एसटी स्थानकात १४ कुटुंबे आश्रयाला आहेत. तालुका प्रशासनाकडून त्यांना अन्नपुरवठा केला जात आहे. वादळ येण्यापूर्वी तालुका प्रशासनाने मंडळाधिकारी, तलाठी यांच्याद्वारे संबंधित लोकांना वादळाची सूचना दिली होती. बुधवारी महसूल अधिकाऱ्यांनी एसटी स्थानकातील कुटुंबांची विचारपूस के ली.
महाराष्ट्राची लालपरी असलेली एसटी सदैव समाजकार्यात अग्रणी असल्याचे दिसून आले आहे. एसटी स्थानकात सर्वसामान्य माणसाला दु:खाच्या प्रसंगी आश्रय मिळाला आहे.
- विजय केळकर, सचिव महाराष्ट्र कामगार सेना, रायगड
वादळाच्या दिवशी मी माझ्या कु टुंबाला घेऊन एसटी स्थानकात आलो. माझ्या कु टुंबात १५ व्यक्ती आहेत. शासन आम्हाला नियमित अन्न पुरवत आहे.
- सुनील केतकर,
रहिवासी, मेंटकर्णी
वादळाने आमचं सर्वकाही नष्ट केलं आहे. एसटी स्थानकात आश्रय मिळाला आहे. मात्र आयुष्याचा पुढील प्रश्न मोठा आहे.
- सुनील रसाळ,
रहिवासी, मेंटकणी