वादळग्रस्तांना आजही वेचावे लागतात संसार; ३ जून रायगड जिल्ह्यासाठी ठरला काळा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 11:40 PM2020-12-30T23:40:09+5:302020-12-30T23:40:13+5:30
३ जून रायगड जिल्ह्यासाठी ठरला काळा दिवस; अनेकांच्या डोळ्यात अजूनही पाणी
आविष्कार देसाई
रायगड : एकीकडे जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असल्याने दिवसाला ५०० हून अधिक जणांना काेराेनाची लागण हाेत हाेती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण हाेते. जिल्ह्यात काेराेनाने शिरकाव करून तीनच महिने झाले असतानाच निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याला जबरदस्त तडाखा दिला. दाेन तासांमध्ये हाेत्याचे नव्हते झाले. लाखो घरे पत्त्याच्या घरांप्रमाणे काेलमडून पडली.
हजाराे विजेचे खांब, महाकाय वृक्ष, हजाराे हेक्टर शेतीचे नुकसान झाले. १५०० गावे अंधारात हरवली हाेती. अद्यापही जिल्हा निसर्गाच्या काेपातून म्हणावा तसा स्थिर झालेला नाही. राज्य सरकारची सुमारे ४०० काेटी रुपयांची आर्थिक मदत काही वादळग्रस्तांना तांत्रिक कारणांनी मिळणे बाकी आहे, तर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या २२५ काेटींपैकी एक दमडीही अद्याप वादळग्रस्तांच्या खात्यात जमा झालेली नाही.
३ जून २०२० हा दिवस रायगड जिल्ह्यासाठी ‘काळा दिवस’ ठरला. देशातील प्रगत तंत्रज्ञानामुळे काही दिवस आधी आपल्याला निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकाेपाचा कालावधी आणि काेठे धडकणार आहे याची माहिती मिळाल्याने जास्तीतजास्त मनुष्यहानी टाळणे सरकार आणि प्रशासनाला शक्य झाले. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टीला वादळ ३ जून राेजी धडकणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सूचित केले हाेते.
तब्बल सव्वाशे वर्षांनी चक्रीवादळाने रायगडला पुन्हा एकदा जबरदस्त आघात केला आहे. निसर्ग चक्रीवादळ सुरुवातीला श्रीवर्धन हरिहरेश्वरला धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला हाेता. त्यानंतर काही तासांमध्ये ते अलिबागकडे कूच करीत असल्याची सूचना मिळाली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. तातडीने एनडीआरएफच्या दाेन तुकड्या अलिबागला बाेलवाव्या लागल्या. परंतु प्रत्यक्षात निसर्ग चक्रीवादळाने चकवा देत आपला विनाशकारी आघात मुरुड तालुक्यावर केला. तब्बल ११० किमीच्या वेगाने वारे वाहत हाेते. वादळ ज्या मुरुडमध्ये धडकले तेथील ६० किमीच्या परिघामध्ये वादळाने
आपल्या अस्तित्वाची विनाशकारी छाप साेडली.
अलिबाग, मुरुड, पेण, राेहे, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या सात तालक्यासह तळा, पाेलादपूर, सुधागड, महाड, खालापूर, कर्जत, उरण, पनवेल तालुक्यातील हजाराे घरे पत्यांच्या बंगल्याप्रमाणे काेलमडून जमिनदाेस्त झाली. घरांचे पत्रे, घरांचे छप्पर कापसासारखे वादळात फुरर्र्कन उडून गेले. दाेन तासांच्या वादळी तांडवामुळे विजेचे पाेल जमिनीतून उखडून खाली काेसळले. विजेच्या तारांवर महाकाय वृक्ष पडल्याने त्या जमिनीवर लाेंबकळत हाेते. साेसाट्यांचा वारा आणि साेबतीला जाेरदार पावसांच्या सरीमुळे निसर्गाच्या राैद्ररुपाचे दर्शन आजही अंगावर काटा आणणारेच हाेते. वादळाच्या तडाख्यात काही ठिकाणी शाळांच्या इमारतीही पडल्याने लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड
जिल्ह्यात एकूण एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड झाली, तर १४ हजार ७०५ विजेचे पाेल, तारा पडल्या हाेत्या. १९०५ गावांमध्ये लाइट गेली हाेती, पैकी ३१६ गावांमध्ये तातडीने वीज सुरळीतपणे सुरू करण्यात प्रशासनाला यश आले हाेते. मात्र १५८९ उर्वरित गावे आठवडाभर अधिक काळ अंधारातच चाचपडत हाेती. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, तळा या तालुक्यातील काही गावांची वीज पूर्ववत हाेण्यासाठी तब्बल दाेन महिन्यांचा कालावधी लागला हाेता.
घरांचे नुकसान
दाेन तासांच्या महाभयानक नाट्यानंतर नागरिक प्रचंड दहशतीखाली हाेते. त्यांनी घराबाहेर पडत वादळाने आणलेला प्रलय आपल्या उघड्या डाेळ्यांनी पाहिला. काेणाच्या घरांचे छप्पर उडाले हाेते, तर काेणाची घरे जमीनदाेस्त झाली हाेती. गाेठे पडून पावसाच्या पाण्यात वाहून गेले हाेते. काहींनी तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावल्याने त्यांच्या अश्रूंचा बांध धरण फुटल्याप्रमाणे वाहत हाेता. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला हाेता. वादळामुळे घरातील सामानाची प्रचंड हानी झाली.
प्रशासनाने केली मदत
वादळानंतर संसार वेचण्यासाठी नागरिक सैरावैरा धावत हाेते. जमीनदाेस्त झालेला संसार पुन्हा उभा करणे हे त्यांच्या समाेर फार माेठे आव्हान हाेते. सर्वसामान्यांचे उद्योगधंदे, व्यवसाय वादळामुळे बंद पडले. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याने चुलीच पेटवता आल्या नाहीत. सरकार मदतीचा माणुसकीचा हात देईल अशी आशा त्यांना लागली हाेती. वादळाच्या भयाण शांततेनंतर काही कालावधीतच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्याला सुरुवात केली.
वीज नसल्याने झाले हाल
वीज गेल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची चांगलीच दमछाक झाली हाेती. शहरे आणि निमशहरांमध्ये साेसायट्यांनी जनरेट भाड्याने आणून पाणी इमारतीवरील टाकीत साेडून आपली गरज भागवली. त्यामुळे तेथील प्रश्न मिटला, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांची सर्वाधिक फरफट झाल्याने ते मेटाकुटीला आले हाेते. लाइट नसल्याने माेबाइल बंद, माेबाइल टाॅवरही बंद असल्याने संपर्क साधण्यासाठी नागरिकांना प्रचंड अडचणींना सामाेरे जावे लागले.