वारंगी रस्त्यावर कोसळली दरड
By admin | Published: July 14, 2016 02:04 AM2016-07-14T02:04:21+5:302016-07-14T02:04:21+5:30
महाड-वारंगी रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मांघरू न ते वाळण कोंडदरम्यान ही दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होऊन
दासगाव : महाड-वारंगी रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मांघरू न ते वाळण कोंडदरम्यान ही दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होऊन सहा गावे आणि वाड्यांचा संपर्क तुटला आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत दरड कोसळून माती रस्त्यावर येत असल्यामुळे दरड काढण्याच्या कामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी काम सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बुधवारी सकाळी नऊ वाजता जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर आलेली माती आणि मोठाले दगड काढण्यास सुरुवात झाली.
गेले दोन दिवस महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाड-वारंगी मार्गावर वाळण कोंडीजवळ मोठी दरड आली. ही दरड कोसळण्यास सुरुवात झाली, त्यावेळेस वारंगी येथून महाडकडे येणाऱ्या एका शिक्षकाच्या निदर्शनास हे आले. त्यांनी लागलीच प्रशासनाला कळविले. तहसीलदार संदीप कदम यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. दरड मोठी असून, दरड कोसळण्याचे सत्र सुरूच होते. शिवाय एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला नदीचे पात्र असल्याने दरड काढण्याचे काम दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
बुधवारी सकाळी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने दरड काढण्यास सुरुवात केली. (वार्ताहर)