मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:34 AM2018-01-04T06:34:02+5:302018-01-04T06:34:15+5:30
भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी २०१८ रोजी शौर्यदिनी झालेल्या संघर्षाचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बंदला जिल्ह्यामध्ये उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला.
अलिबाग - भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी २०१८ रोजी शौर्यदिनी झालेल्या संघर्षाचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बंदला जिल्ह्यामध्ये उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. मुंबई-गोवा या महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तालुक्याच्या ठिकाणी विविध संघटनांनी शांतता रॅलीद्वारे घटनेचा निषेध नोंदवला. सायंकाळी ५ वाजल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले.
१ जानेवारी २०१८ रोजी भीमाकोरेगाव या ऐतिहासिक लढ्याचा शौर्यदिवस साजरा करण्यात येत होता. त्या वेळी दोन गटांमध्ये संघर्ष उफाळून आल्याने मोठ्या संख्येने वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. या घटनेचे पडसाद काही क्षणातच राज्यभर पसरल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. भीमा कोरगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. २ जानेवारी रोजी या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्याला रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अलिबाग येथील बाजारपेठा सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्या होत्या, तसेच अलिबाग एसटी आगारातून गाड्याही सोडण्यात येते होत्या. बंदला सहकार्य करण्याचे आवाहन भारिपसह आरपीआय आणि अन्य संघटनांनी केले होते. सकाळी अलिबाग परिसरातून निषेध रॅली निघाली होती. दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बाजारपेठा धडाधड बंद झाल्या, तसेच अलिबाग एसटी आगारातून बसेसही रोखून धरण्यात आल्या.
अलिबाग एसटी स्टॅण्ड परिसरातील वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला. पेण, कोलाड, माणगाव, महाड या मार्गांवर रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यासह अलिबाग, कर्जत, पनवेल, उरण, रोहे, मुरुड, पोलादपूर, पाली, म्हसळा, श्रीवर्धन, रसायनी, खालापूर येथेही आंदोलने करण्यात आली.
महामार्गावरील शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी एक किलोमीटर आधीच वाहतुकीला रोखून धरले होते. त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकाराला जागाच राहिली नव्हती. काही वेळाने आंदोलकांनी मार्ग मोकळा करून दिल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.
मुंबई-पुणे महामार्ग, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सुरळीत सुरू होता. त्याचप्रमाणे कोकण रेल्वेलाही आंदोलकांनी लक्ष न केल्याने तेथीलही वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महाडमध्ये भीमसैनिकांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी महाड तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी महाड शहरात जोरदार मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. भीमा कोरेगाव घटनेला जबाबदार असणाºया जातीयवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
सकाळी चवदार तळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चास प्रारंभ झाला. या वेळी तालुक्यातील हजारो भीमसैनिक एक झाले होते. निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा महाड प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी सर्व भीमसैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यानंतर हा मोर्चा मुंबई-गोवा महामार्गावर गेला. संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरला. यामुळे जवळपास दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावरच भीमसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले. या वेळी समाजिक नेते मधुकर गायकवाड, विश्वनाथ सोनावणे, सज्जन पवार, मोहन खांबे, मुकुंद पाटणे, राजेंद्र पाटणे, सुनीता गायकवाड, लक्ष्मण जाधव, सुभाष खांबे, शुभदा धोत्रे, सखाराम सकपाळ, संतोष हाटे उपस्थित होते.
महाड बाजारपेठेत यामुळे शुकशुकाट होता. बुधवारी सकाळपासून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भीमसैनिकांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदला यामुळे महाडमध्ये चांगला प्रतिसाद लाभला. महाड व्यापारी असोसिएशननेही याला प्रतिसाद देत या घटनेचा आणि भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. महाड व्यापारी असोसिएशनचा निषेध फलकदेखील लावण्यात आला होता. ग्रामीण भागातील नागरिक शहरात फिरकले नाहीत.
रसायनीत कडकडीत बंद
च्रसायनी : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद बुधवारी रसायनी परिसरातही उमटले. सर्व आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना, व्यापारी वर्ग यांनी भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ रसायनी परिसरात कडकडीत बंद पाळला. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नेहमी गजबजलेल्या मोहोपाडा बाजारपेठेत शुकशुकाट
होता. यामुळे दिवस भर शांतता होती.
च्तीन व सहाआसनी रिक्षा पूर्णपणे बंद होत्या. महाराष्ट्र बंदची घोषणा आदल्या दिवशी झाल्याने खासगी वाहनांची वर्दळ कमी होती. मोहोपाडा मच्छी मार्केट येथे सर्व आंबेडकरवादी संघटनांच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून जोरदार घोषणा दिल्या. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात जाणारी अवजड वाहने काही काळ अडकून राहिली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
श्रीवर्धनमध्ये भीमसैनिकांचा मूकमोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील बौद्ध समाज हितकारिणी संघटनेने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. श्रीवर्धन हे संवेदनशील शहर आहे, त्यामुळे येथे मूकमार्चा काढण्यात आला. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यास गेलेल्या भीमसैनिकांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. त्याचा आम्ही निषेध नोंदवतो, असे भीमसैनिकांनी सांगून संबंधित हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, असे निवेदन तहसीलदारांना दिल्याचे सांगितले.
भीमसैनिकांनी श्रीवर्धनमध्ये बंदची हाक दिल्यानंतर श्रीवर्धन शहरात बंद पाळला गेला. येथील बाजार, रिक्षा स्टॅण्ड, शिवाजी चौक व एसटी स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट होता. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण वाहतूक सेवा कोलमडली. रिक्षा संघटनेने बंद पाळला. एसटी वाहतूक मात्र, व्यवस्थित चालू होती. तालुक्यात कुठेही अनर्थ अथवा गैरप्रकार घडला नाही. शाळा, महाविद्यालये व वैद्यकीय सेवा सुरळीतपणे व्यवस्थित चालू होती.
नागोठणेत चोख बंदोबस्त
च्नागोठणे : भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला नागोठण्यात संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांशी दुकाने, तसेच पाली-आमडोशी-वाकण मार्गावर चालणारी सहाआसनी रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
च्एसटी बसवाहतूक काही अंशीच चालू असल्याने प्रवाशांनी बुधवारी प्रवास करणे टाळले होते, तर शाळा चालू असल्यातरी अंबानी शाळेत जाण्यासाठी बससेवा उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे शक्य झाले नाही.
च्बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पो. नि. पी. बी. गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुसºया दिवशीही कर्जत बाजारपेठ बंद
कर्जत : पुणे-नगर महामार्गावरील भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा कर्जत तालुक्यातील आंबेडकर अनुयायी संघटनेने २ जानेवारी रोजी जाहीर निषेध केला होता. या वेळी तीन तास कर्जत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र, बुधवार, ३ जानेवारी रोजी बाजारपेठेत काही आंबेडकर अनुयायांनी फिरून बाजारपेठ बंद करण्यास भाग पाडली. त्यामुळे आज दुसºया दिवशी कर्जत बाजारपेठ बंद होती.
भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी आंबेडकर अनुयायी संघटनेने कर्जत बंदची हाक दिली होती. झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. मात्र, कर्जतमध्ये सर्व आंबेडकर अनुयायी संघटनांनी मंगळवारीच बंद ठेवून निषेध केला होता. त्यामुळे बुधवारी कोणत्याही संघटनेने बंदची हाक दिली नाही. मात्र, दुपारी अचानक कर्जत बाजारपेठेत काही जणांनी शिवीगाळ करत दुकाने बंद करण्यास सांगितले.
भीमा कोरेगावमध्ये झालेली घटना वाईट आहे. आम्ही मंगळवारी दुकाने बंद ठेवून तिचा जाहीर निषेध केला आहे. मात्र, बुधवारी शिवीगाळ, धमकी देऊन दुकाने बंद करण्यास सांगणे हे काही चांगले नाही, याबाबत सर्व दुकानदारांनी दुकाने बंद करून पोलीसठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला व त्यांच्याकडे निवेदन दिले. तसेच या निवेदनाची प्रत तहसील कार्यालयात देण्यात आली आहे.