कलानगरीत मूर्तिकला जोपासण्यासाठी धडपड
By admin | Published: July 11, 2016 02:25 AM2016-07-11T02:25:44+5:302016-07-11T02:25:44+5:30
शाडूच्या गणेशमूर्तींसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. ऐतिहासिक चिरनेरमध्ये कलानगर वसले असून, या ठिकाणी ३५ ते ४० कुंभार समाजातील कुटुंबे
उरण : शाडूच्या गणेशमूर्तींसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. ऐतिहासिक चिरनेरमध्ये कलानगर वसले असून, या ठिकाणी ३५ ते ४० कुंभार समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील प्रत्येक घरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. कलानगरातच गणेशमूर्ती बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती प्रदूषणवाढीला कारणीभूत ठरत असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती बनविण्याकडेच मूर्तिकारांचा अधिक कल आहे. पारंपरिक कलेचे हे बीज कलानगरात घराघरातून जोपासलं जातंय.
सातत्याने वाढत्या महागाईत पारंपरिक गणेशमूर्ती कलेची जोपासणा कशी करावी, याची चिंता कलानगरातील मूर्तिकारांना कायम सतावत आहे. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या मूर्तिकलेचा व्यवसाय टिकविण्यासाठी सुरू असलेली मूर्तिकारांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. मूर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती, रंग आणि कारागिरांच्या मोबदल्यात प्रत्येक वर्षी २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ होते.
माती, रंगातही मोठी भेसळ असते. त्याउपरही शाडूच्या मूर्ती बनविणारे कारागीर मिळणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. त्यामुळे मूर्ती व्यावसायिकांना वाढत्या महागाईबरोबरच घटत्या कारागिरांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. वडिलोपार्जित पारंपरिक मूर्तिकला जोपासण्यातच कलानगरातील मूर्तिकारांना अधिक रस आहे.
मूर्ती घडवून अधिक नफा मिळवून देणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती सुंदर आणि स्वस्त असल्या तरी त्यामध्ये प्रदूषण फैलावणाऱ्या अनेक वस्तूंचा वापर अधिक असतो. त्याचे दुष्परिणाम मूर्ती विसर्जनानंतर लगेच ध्यानी येतात. मात्र शाडूच्या मूर्ती महागड्या असल्या तरी प्रदूषणविरहित असतात. (वार्ताहर)