डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:24 AM2019-06-15T01:24:04+5:302019-06-15T01:24:31+5:30
आयएमए संघटनेच्या डॉक्टरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अलिबाग : कोलकात्यात झालेल्या डॉक्टरांवरील हिंस्र हल्ल्याच्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी आणि डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले थांबावेत या मागणीकरिता इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए ) अलिबागचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आयएमए सदस्य डॉक्टरांनी शुक्रवारी रायगड जिल्हाधिकाºयांना लेखी निवेदन दिले. उप जिल्हाधिकारी वैशाली माने यांनी हे निवेदन स्वीकारले.
कोलकाता येथील एन. आर. एस. वैद्यकीय महाविद्यालयात ११ जून रोजी सुमारे दोनशे जणांच्या जमावाने कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर व प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सवर (इंटर्न) सशस्त्र हल्ला केला. त्यामध्ये अनेक डॉक्टर्स गंभीर जखमी झाले. डॉक्टर मुखर्जी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे ते अजूनही कोमामध्ये आहेत. डॉक्टरांवर जमावाकडून असे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही अत्यंत चिंतेची व निंदनीय बाब असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.
केंद्र शासनाने आरोग्य आस्थापनावर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने देखील ‘आयएमए’ला पाठिंबा दिला असून, सर्व सदस्य देशांनी असा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने कडक कायदे करावेत, अशी मागणी एका ठरावाद्वारे केली असल्याचे निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.
हिंसाचारामुळे रु ग्ण वेठीस धरले जातात. रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीच्याखाली असल्याने त्यांची कार्यक्षमता देखील खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणीही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रु ग्ण दाखल करून घेण्यास धजावणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काळ्या फिती लावून निषेध
आजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. ‘आयएमए’ने वेळोवेळी याविरु द्ध आवाज उठविला आहेच. शुक्र वारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. देशभरात सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करत आहेत, तसेच जागोजागी धरणे धरत आहेत.