अलिबाग : वाळू माफिया विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; दहा बोटी जप्त, गुन्हा दाखल
By राजेश भोस्तेकर | Published: December 1, 2022 11:04 PM2022-12-01T23:04:05+5:302022-12-01T23:04:49+5:30
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
अलिबाग : पनवेल, तळोजा, खारघर खाडीत अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफिया विरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कारवाईपैकी ही सर्वात मोठी व धडक कारवाई आहे. या कारवाईत ४ मोठया बार्ज आणि ४ मध्यम बार्ज व २ छोट्या संक्शन पंपच्या बोटी अशा १० बोटीवरती धडक कारवाई करण्यात आली असून कोट्यवधीचा माल जप्त करण्यात आला आहे. संबधिताविरुद्ध एन.आर.आय. पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध वाळू काढणाऱ्या माफियाचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल तालुक्यातील खाडी परिसरात अनधिकृतपणे वाळू उपसा करून निसर्गाला हानी पोहचविण्याचे काम वाळू माफिया कडून सुरू होते. याबाबत वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. यावरून जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी कोणतीही सूचना न देता अचानक वाळू माफियांच्या खाडी भागातील अनधिकृत बोटीवर धाड टाकून कारवाई केली. या धाडीत ४ मोठ्या बार्ज आणि ४ मध्यम बार्ज व २ छोटया संक्शन पंपच्या बोटी अशा १० बोटीवरती धडक कारवाई करण्यात आलेली आहे.
खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात ६ बार्ज देण्यात आलेल्या आहेत व संबधितावरती ४१ डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २ बोटी एन.आर.आय. पोलीसाच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत व संबधिताविरुध्द एन.आर.आय. पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ बोट गाळामध्ये फसली असल्याने जागेवरती नष्ट करण्यात आली आहे व १ बोट एन.आर.आय. पोलीसानी ताब्यात घेतली असुन त्यावर कार्यवाही चालु आहे. तसेच ५ संक्शन पंप नष्ट करण्यात आले आहेत. कोटयवधी रुपयाचा मुद्देमाल केलेल्या कारवाईत पाण्यामधून जप्त करुन संबधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंतची ही सर्वात मोठी व धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने वाळू माफिया याचे धाबे दणाणले आहेत.