एसटी कामगारांच्या संपाचा फटका, महाड आगारात शुकशुकाट, खासगी वाहन चालकांकडून होतेय लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:42 AM2017-10-19T06:42:31+5:302017-10-19T06:42:46+5:30
ऐन दिवाळी सणात एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. संपाच्या दुस-या दिवशी महाड आगारात शुकशुकाट होता. कामगार आणि शासन यामध्ये तोडगा निघत नसल्याने संप सुरूच राहिला...
दासगाव : ऐन दिवाळी सणात एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. संपाच्या दुस-या दिवशी महाड आगारात शुकशुकाट होता. कामगार आणि शासन यामध्ये तोडगा निघत नसल्याने संप सुरूच राहिला आणि याचा फायदा मात्र खासगी वाहन चालकांनी घेतला. दिवाळीत प्रवाशांची खासगी वाहन चालकांनी लयलूट केली आहे. संपूर्ण राज्यात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कामगारांनी संप पुकारला आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस असून, शासन आणि कामगार यांच्यामध्ये अद्याप तोडगा न निघाल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. खासगी वाहन चालकांकडून पनवेल ते महाड या प्रवासाकरिता प्रवाशांकडून ६०० रु पये घेतले जात आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.
ऐन दिवाळी सणाला लागलेल्या सुट्या आणि सणाकरिता खरेदीसाठी प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. आजही संप असला तरी प्रवासी एसटी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, संप सुरूच राहिला असल्याने प्रवासी बेहाल झाला आहे. खासगी वाहन चालक मात्र प्रवाशांकडून चांगलीच लयलूट करत आहेत. एकट्या महाड आगारात ३३० कामगार संपावर आहेत. त्यातील १० कामगार हे वैद्यकीय रजेवर असल्याने ते या संपात सहभागी नाहीत. महाड आगारात कामगार संपामुळे जवळपास एसटीच्या ३९० फेºया रद्द झाल्या आहेत. यामुळे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. महाड आगारात सध्या आगार व्यवस्थापक आणि चार पर्यवेक्षक असे केवळ चार अधिकारी कामावर आहेत. महाड आगारात या संपामुळे जवळपास ६६ गाड्या उभ्या आहेत तर महाड आगाराच्या देखील गाड्या अन्य आगारात उभ्या आहेत. ग्रामीण दुर्गम भागातील देखील एसटी फेºया बंद असल्याने महाडमध्ये खरेदीसाठी येणाºया अनेक दुर्गम गावातील प्रवाशांना शहरात येता आलेले नाही.
महाड आणि पोलादपूर हे दोन्ही तालुके दुर्गम क्षेत्रात आहेत. यामुळे याठिकाणी जाणे-येणे करण्याकरिता एसटीशिवाय पर्याय नाही. खराब रस्ते असल्याने या गावांतून खासगी प्रवासी सेवा नाही. महाडसारख्या शहरात यायचे असेल तर या एसटीचीच वाट ग्रामस्थांना पाहावी लागते. महामार्गावर आणि शहरालगत असलेल्या गावांना या संपाचा फटका बसला नाही. याठिकाणी अनेक वर्षांपासून विक्र म आणि तीन आसनी रिक्षा सेवा उपलब्ध आहे. यामुळे विक्र म रिक्षा चालकांनी मात्र या संपाचा फायदा न घेता केवळ सेवा बजावत नियमित रकमेतच प्रवासी ने-आण करणे सुरू ठेवले आहे. यामुळे जवळच्या गावांना याचा परिणाम जाणवला नाही.
नागोठणे बसस्थानकात शुकशुकाट
च्नागोठणे : एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांसंदर्भात संपाचे हत्यार उगारले असल्याने सलग दुसºया दिवशीही बसस्थानकात एसटी बस, तसेच प्रवासी नसल्याने स्थानकात स्मशानशांतता पसरली होती. दिवाळी सणानिमित्त पडलेल्या सुटीमुळे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी जाणाºया नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून अनेकांनी रेल्वे, तसेच खासगी वाहनांद्वारे मार्गस्थ होण्याचा मार्ग निवडला आहे. येथील रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहेत.
कर्जतमध्ये प्रवाशांचे हाल
कर्जत : एसटी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी ऐन दिवाळीच्या तोंडावर संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत.
२त्यांनी दिलेल्या निवेदनात राज्य शासकीय व इतर क्षेत्रातील कर्मचाºयांपेक्षा एसटी कर्मचाºयांचे वेतन खूपच कमी आहे. किमान वेतन नऊ हजार रु पये मिळते. या वेतनात प्रपंच चालविणे अवघड होऊन बसले आहे. १९९५पर्यंत एसटी कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाºयांइतके होते.
३त्यानंतर प्रत्येक वेळी आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून कामगारांच्या वेतनावर बंधने आणली. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचारी व एसटी कर्मचाºयांच्या वेतनात मोठी तफावत आली. शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन मिळावे म्हणून सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी संघटनेने संपाचे हत्यार उगारले आहे.
४कर्जत एसटी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने ह. रा. छत्तीसकर, भगवान लाड, नागेश भरकले, नितीन कोळी, विठ्ठल केदासे, कृष्णा शिंदे, सुनीता कपाले, मुंढे आदींच्या नेतृत्वाखाली संप करण्यात येत असून सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे, आदी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला आहे.
एका दिवसात ५० लाखांचा फटका
अलिबाग : राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाच्या मंगळवारच्या पहिल्याच दिवशी रायगड एसटी विभागास तब्बल ५० लाख रुपयांच्या उत्पन्नाचा फटका बसला असल्याची माहिती रामवाडी-पेण येथील रायगड विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक गजानन पाटील यांनी दिली आहे.
२रायगड विभागात एकूण आठ एसटी डेपो आहेत. या सर्व डेपोंच्या माध्यमातून एसटी बसच्या विविध मार्गावर दररोज ३ हजार १० फेºया होतात. यातून सुमारे २ लाख प्रवाशांना वाहतूक सुविधा देण्यात येते. दररोजचे प्रत्येक डेपोचे आर्थिक उत्पन्न सरासरी ५ लाख ५० हजार रुपये असते. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने प्रवासी संख्येत मोठी वाढ होवून हे दैनंदिन उत्पन्न ६ ते साडेसहा लाखावर जाते. मंगळवारी रोहा-कोलाड मार्गावरील एसटीच्या १२ फेºया वगळता जिल्ह्यात एसटीची प्रवासी वाहतूक संपामुळे होवू शकली नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्व म्हणजे आठ आगारांचे एकूण सरासरी ५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे पाटील यांनी पुढे सांगितले.
३रोहा एसटी डेपोमधील चार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले नाहीत. यामध्ये एसटी वाहक माधव पाटील, चालक एस.एस.पोवळेकर, तंत्रज्ञ जितेंद्र गायकवाड आणि लेखनिक संदीप गायकवाड यांचा समावेश आहे. एसटी वाहक माधव पाटील व चालक एस.एस.पोवळेकर यांनी रोहा-कोलाड मार्गावरील आपली एसटी बस नियमितपणे सुरु ठेवली आहे. परिणामी रोहा शहरातून महामार्गापर्यंत प्रवाशांना पोहोचता येत असून, तेथून पुढे उपलब्ध वाहनाने प्रवासी प्रवास करीत आहेत.
४गेल्या आठ वर्षांत एसटी कर्मचारी संघटनेचे एकूण तीन संप झाले. त्यात सहभागी झालेले कर्मचारी आजही त्या संपाच्या झळा सोसत आहेत. पूर्वी संपात सहभागी झालेले आणि आता निवृत्त झालेले कर्मचारी यांचे दोन-दोन लाख रुपये महामंडळ अद्याप देत नाही. असे अनेक कर्मचारी आहेत, अशी भूमिका संपात सहभागी न झालेले आणि कर्तव्यावर हजर असलेले एसटी वाहक माधव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
५संपात सहभागी होण्याचे दुष्परिणाम सांगताना ते पुढे म्हणाले, पगारवाढ झाली पाहिजे यात शंका नाही. आमचीही ती मागणी आहे. परंतु आड्यातच नाही तर पोहोºयात कुठून येणार. जे महामंडळाकडून मिळू शकत नाही त्याकरिता संप करणे योग्य नाही. गेल्या वेळच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांचे पगार महामंडळाने कापले, परंतु त्याच वेळी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांचे पगार मात्र महामंडळाने कापले नाहीत. अशा परिस्थितीत संपात सहभागी होणे नाही अशी भूमिका स्वीकारली असल्याचे पाटील म्हणाले.
कर्मचारी व प्रवासी लवकरच एकत्र होतील-सुर्वे
नांदगाव/ मुरूड : एसटी कर्मचारी वृंदांना परिवहन मंत्री दिवाकर रावते सांगतात की, २५ वर्षे उलटून जातील तरी सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळू शकत नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वात कमी पगार हा एसटी महामंडळातील कर्मचाºयास दिला जातो. एसटी स्थापनेपासून ंहा कर्मचारी प्रवासी वर्गाला सर्वात चांगली सेवा देत आहे. कर्मचारी व प्रवासी लवकरच एकत्र होतील व सामूहिक आंदोलन झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील तेव्हा शासनाने एसटीचा संप तत्काळ मिटवण्यासाठी योग्य ती मध्यस्थी करावी, अशी आग्रहाची भूमिका मुरु ड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी व्यक्त केली. पगारात वृद्धी होण्यासाठी एसटी कर्मचारी वृंदांचे आंदोलन मुरु ड आगाराच्या समोर सुरु आहे. यावेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष सुर्वे बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी आदी उपस्थित होते.