रायगडला वादळाचा तडाखा, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 07:08 AM2018-09-30T07:08:51+5:302018-09-30T07:09:15+5:30
अलिबाग, नागोठणेत वीजपुरवठा खंडित
अलिबाग : परतीच्या पावसाबरोबर जोरदार वादळाच्या तडाख्यामुळे शुक्रवारी अलिबाग, कार्लेखिंड, पेण, नागोठणे परिसरात मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. कार्लेखिंड-रेवस विभागातील २२ तास वीजपुरवठा खंडित झाला. तर अलिबाग तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. या वादळामुळे याचा फटका जास्त रेवस फिडरच्या लाइनला बसला आहे.
लघुदाब वाहिनी आणि उच्चदाब वाहिनीवरील विद्युत जनित्रयंत्रावर, इन्सुलेटरवर वीज कोसळून काही ठिकाणी तारा जंपर, तर पोल पडलेले आहेत. वादळामुळे विद्युत जनित्र यंत्र तुटून पडलेले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू असून, त्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे, असे मंडळाच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. वादळामुळे तयार झालेली भात शेती कणसाच्या वजनामुळे वाऱ्याबरोबर जमीनदोस्त झाली आहे, तर काही ठिकाणी सर्वच भातशेती पाण्याखाली केली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कार्लेखिंड-रेवस विभागात आंबा कलमाच्या बागा आहेत, त्या बागांमधील झाडे कोसळल्याने बागायतदारांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
या वादळामुळे परिसरातील वीजवाहिन्या, वीज खांबांचे नुकसान झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तडाख्याने अनेक ठिकाणच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. वादळी पावसाने परिसरातील झाडे उन्मळून पडली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून अनेक ठिकाणी पडल्याने चालकांना वाहने चालवताना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी सुरूच्या बागांचे नुकसान झाले.
चिरनेरला घरावर वीज कोसळून सामान खाक
च्विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शुक्र वारी चिरनेरमधील एक घर जळाले. घराला लागलेल्या आगीत सामानासह संपूर्ण घर खाक झाले. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात एकूण १७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
च्शुक्र वारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या घरावर वीज पडली आणि घराला आग लागली. संजय पाटील यांच्या मालकीच्या या घरातील मंडळी साखरचौथ गणपतीच्या दर्शनासाठी गेली असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही, फ्रीज, कपाट, कपाटातील दागिने, घरातील अन्नधान्य, भांडी आणि कागदपत्रे जळून खाक झाली.
च्विजेची तीव्रता एवढी होती की, घरातील भांडी, पंखे आणि कपाट वितळून गेले. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम एक लाख ५० हजारही जळाले. चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी यांनी रात्री उशिरापर्यंत घराचा पंचनामा केला. या वेळी १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. शनिवार उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून या कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.