मधुकर ठाकूर
उरण: चिरनेर -साई रस्त्याच्या कडेला दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या २७ वर्षीय अज्ञात महिलेच्या निर्घृण खुन प्रकरणी उरणपोलिसांनी संशयित आरोपीला २४ तासांतच शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. प्रेमसबंधातुनच महिलेचा गळा दाबून खुन केल्याची नराधम आरोपींनी कबुली दिली असुन न्यायालयाने त्याला २९ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चिरनेर-साई रस्त्याच्या कडेला गुरुवारी कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. उरण पोलिसांना अज्ञात महिलेची ओळख पटवणे जिकिरीचे काम झाले होते.
परिसरातील सर्वच पोलिस ठाण्यात मिसिंग महिलेचा शोध घेत असताना पोलिसांना मानखुर्द पोलिस ठाण्यात पुनम चंद्रकांत क्षिरसागर (२७) ही अविवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आईने दाखल केल्याचे निदर्शनास आले.हाच धागा पकडून उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,पो.नि.शिवाजी हुलगे व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वेळ न दवडता मयत महिलेच्या आई आणि नातेवाईकांशी संपर्क साधला.पोलिसांनी मयत महिलेच्या मृतदेह दाखवताच आईने मुलीचा मृतदेह ओळखला.मयत महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनाही हायसे वाटले.
पोलिस तपासात पुनम ही मानखुर्द येथील साठेनगर येथे आई सोबत राहतात होती. परिसरातील सॅण्डस पार्क येथील एका इमारतीत घरकाम करीत होती.तिचे नागपाडा-मुंबई येथे राहणाऱ्या टॅक्सी चालक निझामउद्दीन शेख (२८) यांच्याशी प्रेमसंबंध होते. प्रेमसबंधामुळे निझामउद्दीन नेहमीच कामाच्या ठिकाणी मयत महिलेला टॅक्सीतून सोडून आणीत होता.मात्र दोघांत काही कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर निझामउद्दीनची चिडचिड झाली होती. त्यामुळे आरोपीने तीचा कायमचा काटा काढायचा बेत आखला.हा बेत तडीस नेण्यासाठी नराधम आरोपींने तिला बाहेर फिरायला जायचे आहे अशी बेमालूमपणे थाप मारुन १८ एप्रिल रोजी जे.जे.हॉस्पिटलजवळ टॅक्सीत बसविले.तिला टॅक्सीतून कल्याण - खडवली येथे आणली आणि टॅक्सीतच गळा दाबून खून केला. पुनमचा मृतदेह टॅक्सीतून चिरनेर -साई रस्त्याच्या कडेला निर्जन ठिकाणी टाकून पलायन केले.
उरण पोलिसांनी कोणताही धागा नसताही २४ तासांच्या आत शिताफीने खुनाचा तपास करुन आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनेही खुनाची कबुली दिली आहे.न्यायालयानेही तपासासाठी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.