रायगड जिल्हा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 11:53 PM2021-01-11T23:53:02+5:302021-01-11T23:53:17+5:30

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नऊ वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष

Structural audit of Raigad District Hospital on waiting | रायगड जिल्हा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट वेटिंगवर

रायगड जिल्हा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट वेटिंगवर

googlenewsNext

निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : भंडारा येथील भयंकर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या धर्तीवर रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जानेवारी, २०२०ला फायर ऑडिट झाले असले, तरी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सन २०१२ पासून झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेळेत स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही, तर केव्हा इमारत कोसळेल ते सांगता येत नाही.

राज्यात सातत्याने अनेक सामान्य रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार दरवर्षी फायर ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही कक्षात फायर सिलिंडर लावल्याचे दिसून आले, तसेच दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात येत आहे. मात्र रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था बिकट आहे. म्हणून येथे अत्याधुनिक सुविधा पुरविणे देखिल कठीण झाले आहे.

रुग्णांच्या सोईसुविधांकडे लक्ष देण्याची मागणी

जिल्हा रुग्णालयाचे कामकाज हायटेक करण्याऐवजी रुग्णालयात आवश्यक सोईसुविधा व रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, तसेच इमारतीची सतत सुरू असलेली डागडुजी न करता पुन्हा बांधकाम करण्यात यावे.
- अश्विनी कंटक

जिल्हा रुग्णालयात आवश्यक सोईसुविधांचा अभाव आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी वेळेवर उपचारही मिळत नाहीत. दिवसभरातून एखादाच वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करतो, तसेच रुग्णांना गरम पाणीही मिळत नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुधारताना रुग्णांच्या सोईसुविधांकडेही लक्ष द्यावा.
- लवेश नाईक

इमारत जमीनदोस्त करून नव्याने बांधणे गरजेचे 
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे छत वेळोवेळी पडून काही जणांना छोट्या-मोठ्या प्रमाणात इजा झाल्या होत्या. त्यामुळे आता या रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून इमारत पूर्ण जमीनदोस्त करून नवी इमारत बांधणे गरजेचे आहे.
- डाॅ.सुहास माने, 
जिल्हा शल्य चिकित्सक

पाहणीत काय आढळले 
इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे इमारत लीकेज होत आहे. त्यामुळे सतत इलेक्ट्रिकचा प्राॅब्लेम होत आहे. जिल्हा रुग्णालयात विविध अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा आणली आहे. मात्र, जुन्या इलेक्ट्रिक 
सीस्टिमला नवीन आरोग्य उपकरणे सपोर्ट 
करत नाहीत.

बाह्यस्वरूप चकाचक 
रुग्णालयाच्या बाह्य स्वरूपावर जो गेला तो फसला, असेच म्हणावे, अशी स्थिती सध्या आहे. बाह्यस्वरूप चकाचक असले, तरी त्या रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था भयानकच आहे. जुने बांधकाम असल्याने अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविणे जोखमीचे झाले आहे

 

Web Title: Structural audit of Raigad District Hospital on waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.