रोहा : बाहेरील डंपर वाहतुकीला विरोध करणाऱ्या स्थानिक डंपर मालकाला गाडीने उडविल्याने सानेगाव जेट्टीवर व्यवस्थापन आणि स्थानिक संघर्ष पेटला आहे. वातावरण चिघळल्याने गुरुवारी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. यावेळी अलिबाग-रोहा मार्गावर रास्तारोकोही करण्यात आला. यावेळी काही संतप्त महिलांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्नही केला मात्र, पाेलिसांनी त्यांना राेखल्याने पुढील अनर्थ टळला.
सानेगाव येथे इंडो एनर्जी इंटरनॅशनल जेट्टीवर बार्जच्या माध्यमातून इस्पात कंपनीसाठी कोळशाची आवक होते. जेट्टीवर उतरलेल्या कोळशाची इस्पात कंपनीसाठी वाहतूक स्थानिकांच्या डम्परने केली जाते. जेट्टी व्यवस्थापन आणि स्थानिक डम्पर मालकांमध्ये वाहतूक दर वाढवण्याबाबत संघर्ष सुरू असून पिळवणूक हाेत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
आम्हाला रोजगार मिळावा म्हणून आम्ही जेट्टीला परवानगी दिली. आता आमचा रोजगार हिरावून घेतला जात असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. स्थानिकांना गाडीने उडवणाऱ्या मॅनेजर मंगेश कामथे याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.- नंदकुमार म्हात्रे, अध्यक्ष, चालक-मालक व वाहक वाहतूक सहकारी संस्था
जेट्टीवर तणावविरोध करणाऱ्या स्थानिक डम्परमालकाला गाडीने उडवले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. झालेल्या घटनेचा उद्रेक होत स्थानिक संतप्त झाले. अलिबाग-रोहा मार्गावर रास्तारोको करीत कोळशाच्या गाड्या अडवल्या. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. पोलिसांना संघर्षाची माहिती मिळताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस उप अधीक्षक सोनाली कदम यांनी सामोपचाराने परिस्थिती नियंत्रणात आणली.