अभय आपटे
रेवदंडा - अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जला अपघात झाला. रायगड पाेलिस, तटरक्षक दलाने रेस्क्यू ऑपरेशन करत 16 खलाशांचे प्राण वाचवले आहेत, अशी माहिती रायगडचे अतिरीक्त जिल्हा पाेलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
येथील जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही.मंगलम बार्ज सुमारे दाेन हजार 400 मेट्रिकटन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून बार्ज निघाली हाेती. बार्जवर 16 खलाशी हाेते. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलाेमीटर अंतरावर असताना बार्ज समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची काेणतीच माहिती यंत्रणेला संबंधीत कंपनीने दिली नाही.आहाेटी सुरु झाल्याने बार्ज गाळात रुतली. काही कालावधीनेभरती सुरु हाेईल आणि बार्ज पुन्हा कंपनीकडे येईल असे व्यवस्थापनाला वाटले असावे परंतू सुमारे आठ-दहा तासांनी बार्ज खालून लिक झाली. बार्जमध्ये हळूहळू पाणी शिरु लागल्याने नंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. सकाळी याबाबत रायगड पाेलिसांना माहिती मिळताच. भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता बचाव कार्य हाती घेण्यात आले, असे गुंजाळ यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडे दहा असे तब्बल 17 तास खलाशी बार्जवरच अडकून पडले हाेते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे दाेन हेलीकाॅप्टर, बाेटी बचाव कार्यात पुढे हाेत्या. बार्जवरील 13 खलाशांना हेलीकाॅप्टरच्या, तर तीन खलाशांना बाेटीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. सर्व खलाशी सुखरुप आहेत, असेही गुंजाळ यांनी स्पष्ट केले.
सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरूण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधिक्षक, अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरिक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ,उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम ,रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक थोरात, पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी हाेते.दरम्यान, आपत्तीच्या कालावधीत कंपनीने यंत्रणेला माहिती दिली नाही. त्यामुळे 16 खलाशांच्या जीव धाेक्यात घालण्यात आला. कंपनीच्या या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत संबंधीत कंपनी व्यवस्थापनावर कारवाई हाेणार का हा खरा प्रश्न आहे