नेरळ : माथेरानच्या डोंगरातील जुम्मापट्टीजवळ असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्याचा रस्ता पावसामुळे खचला आहे. त्यामुळे त्या भागातील असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये येणारे शिक्षक शाळेत वेळेवर पोहचत नाहीत. गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थी शाळेत येत आहेत, मात्र शिक्षक नसल्याने त्यांना पुन्हा घरी जावे लागते. वन जमिनीतून जात असलेला रस्ता शासनाने प्राधान्याने तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.जुम्मापट्टीपासून किरवली या कर्जतजवळच्या ग्रामपंचायतीपर्यंत १७ आदिवासी वाड्या असून त्या वाड्यांमध्ये जाण्यासाठी आजतागायत रस्ता झालेला नाही. वन जमिनीवर वसलेल्या त्या आदिवासी वाड्यात जुम्मापट्टी भागाकडून आसलवाडीपर्यंत जाण्याचा रस्ता आहे. आसलवाडीपर्यंत जाणारा रस्ता डोंगराच्याकडेने असून त्या रस्त्यात जुम्मापट्टीपासून आसलवाडीपर्यंत तीन नाले वाहतात. माथेरानच्या डोंगरातील पाणी त्या ठिकाणी वाहून येत असल्याने प्रवाहाला वेगही असतो. यापैकी एका ठिकाणी साकव पूल बांधण्यात आला आहे. अन्य दोन्ही ठिकाणी पाण्यातूनच वाट काढावी लागते. पावसाचा जोर वाढल्यास आदिवासी ग्रामस्थ घराबाहेर पडतच नाहीत. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे नाल्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे पायवाटेच्या रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे पायवाट धोक्याची झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ता धोकादायक बनल्याने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आसलवाडी, बेकरेवाडी, नाण्याचा माळ येथील जिल्हा परिषद शाळा भरल्याच नाहीत. शाळेत विद्यार्थी आले पण शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना आल्या पावली परतावे लागले. याठिकाणी कार्यरत शिक्षकांना आदिवासी भागातील देलेली नियुक्ती शिक्षा वाटते. त्यामुळे ते बदलीसाठी प्रयत्न करीत असल्याचे बेकरेवाडीतील आदिवासी कार्यकर्ते जैतू पादीर यांनी सांगतिले.- शिक्षक शाळेत पोहचत नसल्याने पटसंख्या घटण्याची शक्यता आहे. याची नोंद जिल्हा शिक्षण विभागाने घेण्याची गरज आहे. शिक्षकांना शाळेत येताना रस्त्यात काही अडचणी आल्यास आणि आम्हाला कळवल्यास कितीही पाऊस असला तरी त्यांना सुरक्षितरीत्या वाडीपर्यंत नेऊन शाळा सुरू ठेवू, अशी सूचना आसल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वामन सांबरी यांनी केली आहे.आसलवाडी भागातील शाळांमध्ये शिक्षक येत नसल्याची तक्रार त्या त्या शाळेतील ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे त्या शाळेत असलेल्या शिक्षकांकडे विचारणा केली जाईल आणि ग्रामस्थांच्या तक्रारींवर योग्य निर्णय घेतला जाईल.- बी. एस. हिरवे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी कर्जतशासनाने रस्त्याचे काम करण्यासाठी वन विभागाला सूचित करावे आणि रस्त्याचे काम करून घ्यावे, जेणेकरून दरवर्षी अशी स्थिती निर्माण होणार नाही.- गणेश पारधी, ग्रामस्थ
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान; माथेरानमधील आदिवासी वाड्यांतील स्थिती बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:43 AM