मिनीबससाठी विद्यार्थ्यांचे उपोषण
By admin | Published: February 9, 2016 02:23 AM2016-02-09T02:23:29+5:302016-02-09T02:23:29+5:30
माथेरान मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी माथेरानमधील विद्यार्थ्यांनी सोमवारीपासून कर्जत आगाराजवळ आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
नेरळ : माथेरान मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी माथेरानमधील विद्यार्थ्यांनी सोमवारीपासून कर्जत आगाराजवळ आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
कर्जत एसटी महामंडळाची कर्जत- माथेरान मिनीबस सेवा ११ आॅक्टोबर २००८ ला सुरु झाली. बससेवा सुरु झाल्यापासून दिवसभरात सहा फेऱ्या होत असत, परंतु कालांतराने तांत्रिक अडचणी, अपुऱ्या बसेस, बस बंद पडणे आदी अडचणींमुळे या बससेवेत अनियमितता निर्माण झाली. या सर्वांचा फटका येथील पर्यटनावर व खास करून शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांना बसू लागला. माथेरानमधील विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना कर्जत व अन्य शहरात जावे लागते. यासाठी बस सोयीस्कर असल्याने सर्व विद्यार्थी या बसनेच प्रवास करतात. बसची अपुरी संख्या, जुन्या बसेसमुळे वारंवार बस बंद पडतात. परीक्षेचा कालावधी सुरु आहे. बस रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
कर्जत-माथेरान मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदने दिली,आंदोलने केली. परंतु ढिम्म प्रशासनाला जाग यावी यासाठी अखेर माथेरानच्या विद्यार्थ्यांनी व प्रवासी संघटनेने २१ जानेवारीला मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी उपोषणाचे पत्र प्रशासनाला दिले होते. परंतु १७ दिवसांच्या कालावधीनंतरही सुरळीत सेवा सुरु न झाल्याने अखेर सोमवारी माथेरानचे नगरसेवक दिनेश सुतार, शालेय विद्यार्थी विशाल परब, अंकित पार्टे, मनीष कदम, सायली झोर आदी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. यावेळी आमदार सुरेश लाड, भाई थोरवे, वसंत भोईर, आदींनी उपोषण स्थळी भेट दिली.
आ. सुरेश लाड म्हणाले की, परिवहन महामंडळाकडे नवीन बस घेण्यसाठी निधी नसेल तर आमदार निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते परंतु बससाठी तशी रक्कम अनुज्ञय नाही असे कळविले आहे, विशेषबाब म्हणून त्यांनी तो प्रस्ताव अर्थ नियोजन मंडळाकडे पाठवून त्या निधीची तरतूद करून घेतली पाहिजे होती. जिल्हाधीकाऱ्यांनी तशी तसदी घेतली नाही. जर एसटीकडे नवीन बस घेण्यासाठी निधी नसेल तर आम्ही लोकवर्गणी किंवा आंदोलन करून प्रशासनाला निधी गोळा करून देऊ.