विद्यार्थी आॅनलाइन; शिक्षक आॅफलाइन
By admin | Published: July 10, 2015 09:54 PM2015-07-10T21:54:50+5:302015-07-10T21:54:50+5:30
विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक या सर्वांची माहिती आता एका क्लिकवर आॅनलाइन करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. या संदर्भात मुरुड तालुक्यातील ८० शिक्षकांचे प्रशिक्षण
मुरुड : विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक या सर्वांची माहिती आता एका क्लिकवर आॅनलाइन करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. या संदर्भात मुरुड तालुक्यातील ८० शिक्षकांचे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर एस. ए. हायस्कूल मुरुड येथे आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक युनिक आयडीशी जोडून त्यांची कौटुंबिक माहिती, जन्मतारीख, धर्म, जात, अभ्यासक्रमातील प्रगतीचा आलेख, त्यांचे छंद, आवडीनिवडी, कल या सर्व बाबी पेपरलेस होण्यासाठी आॅनलाइन प्रदर्शित करण्याचा शासनाचा मानस आहे. यामध्ये विद्यार्थी शिकत असलेली इमारत, स्थापना वर्ष, क्रीडांगण आदी दहा मानके, विषय शिक्षक या सर्व बाबींचा तपशीलवार समावेश असल्याने पालकांना आपला पाल्य कोणत्या स्थानावर आहे, हे आॅनलाइन कळणार आहे.
यासाठी प्रत्येक शाळेची संपूर्ण आॅनलाइन माहिती भरण्याचे काम मात्र शिक्षकांनाच करावे लागणार असल्याने त्यांच्या मूळ अध्यापन कार्याला बगल देऊन १५ आॅगस्टपर्यंत हे तांत्रिक विभाग पूर्ण करणे अनिवार्य आहे. माध्यमिक शाळेत ही जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांना ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सदरहू आॅनलाइन माहिती भरताना अध्यापन कार्यात खंड पडणार आहे हे निर्विवाद. परिणामी विद्यार्थी वाऱ्यावर सोडले जाणार का? अशी साधार भीती व्यक्त होत आहे.
प्रत्येक शाळेतील संगणकाची उपलब्धी, डोंगराळ भागात मिळणारी इंटरनेट सेवा, विजेचा लपंडाव, भारनियमन या सर्व बाबींवर मात करून शिक्षकवर्गाला हे काम विनातक्रार करावे लागणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान नाराजी लपून राहिलेली नाही. सदरहू कामासाठी गटस्तरावर किंवा समूहस्तरावर शिक्षकांव्यतिरिक्त एखाद्या प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी, अशी मागणी शिक्षकांमधून होताना दिसून आली.