पाली : सुधागड तालुक्यातील राजीप कोंडी धनगरवाडी शाळेतर्फे नेणवली येथील प्राचीन लेण्यांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या वेळी चिमुकल्यांनी प्राचीन नेणवली लेण्यांची माहिती घेऊन संवर्धनासाठी पुढाकार घेतला. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. सर्वांनी मिळून लेणी, सभागृह, स्तूप व सभोवतालचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर राजेंद्र खैरे यांनी मुलांना लेण्यांची माहिती दिली व त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व सांगितले.
सुधागड तालुक्यातील प्राचीन नेणवली लेणी, २१ लेण्यांचा समूह; काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाहीखडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्री पर्वतात नेणवली लेण्या आहेत. लेण्यांचा मार्ग या दोन्ही गावांपासून खरबाच्या वाटेने घनदाट अशा डोंगरांमध्ये जातो. लेणी गावापासून साधारण अडीच किमी अंतरावर आहेत. कोंडी धनगरवाडी गावातूनदेखील लेण्यांवर पोहोचता येते. अतिशय दुर्गम असलेल्या या लेणी समूहात एकूण २१ लेण्या आहेत. लेण्यांतील सर्वात मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस असलेला घुमट दगडात कोरला आहे. घुमटचा व्यास १.५ मीटर, उंची ३.५ मीटर आहे. घुमटाच्या वर मध्यभागी झाकणासारखा आकार असून चौरसाकृती छिद्र आहे. स्थानिक लोक या घुमटाला रांजण म्हणतात. या लेण्यातील सभागृह सर्वात मोठे आहे.याचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. हे सभागृह २१ मीटर बाय १६ मीटर एवढे विशाल आयताकृती आहे. भिंतीत एकूण १७ खोल्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत दगडी ओटा आणि चौकोनी खिडकी आहे. काही खोल्या एकांतवासासाठी खोदल्या आहेत. सभागृहांमध्ये ठाणाळे लेण्यांप्रमाणे नक्षीकाम नाही किंवा लेण्याचा काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाही.
आपल्या प्राचीन व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती मुलांना व्हावी, त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली होती. कारण हेच विद्यार्थी लेणी व ऐतिहासिक ठेव्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढे सरसावतील.- राजेंद्र खैरे, मुख्याध्यापक, कोंडी धनगरवाडी शाळा