शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By admin | Published: July 21, 2015 04:57 AM2015-07-21T04:57:01+5:302015-07-21T04:57:01+5:30
रायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना
जयंत धुळप ,अलिबाग
रायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ््यात जीवावर उदार होवून काळ नदी पार करावी लागत आहे.
छत्रीनिजामपूर आणि वारंगी दरम्यानच्या काळ नदीवरील पूल तीन वर्षांपूर्वी पुरात वाहून गेला. मात्र शासकीय यंत्रणेस पूल तुटल्याचा पत्ताच नसल्याने मुलांना जीव धोक्यात घालून, नदी पार करुन वाघेरी-वारंगी येथील जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयात यावे लागते.
साकव दुरूस्त करण्यासाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी शाळेत येण्याकरिता तब्बल तीन किमीची पायपीट ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना दररोज करावी लागते. दररोजच्या सहा किमीची पायपीट वाचविण्याकरिता हे विद्यार्थी तुटलेल्या पुलाच्या बाजूने काळ नदीच्या पात्रात उतरुन, जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन नदी पार करतात.
अतिवृष्टी झाल्यास पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होते. अशा वेळी प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु फेरा वाचविण्यासाठी विद्यार्थी नदी पार करत असल्याचे जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा, याकरिता शाळा सुरु झाल्यावर जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावरही कोणतेही आदेश झाले नाही आणि कार्यवाहीचा तर पत्ताच नाही.
छत्रीनिजामपूर आदिवासीवाडी आणि वारंगी गावाचा साकव गेल्या तीन वर्षांपूर्वी मोडला आहे. हा साकव दुरूस्तीसाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तब्बल तीन किलोमीटर अंतराची पायपीट करुन या ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते. जाता-येता दररोजच्या सहा किमी अंतराची पायपीट वाचविण्याकरिता ही मुले तुटलेल्या पुलाच्या शेजारुनच काळ नदीपात्रातून जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन दररोज नदी पार करतात. अतिवृष्टी होत असेल तर या नदीची पातळी वाढते. अशा वेळी या प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु या मुलांना तो धोका पत्करुन नदी पार करावी लागते.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर मार्ग निघावा, पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा याकरिता स्थानिक ग्रामस्थांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभागास देखील याची कल्पना दिली होती, परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर यंदा शाळा सुरु झाल्यावर शाळेचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावर कोणतेही आदेश झाले नाही. महाडचे आमदार शिवसेनेचे भरतशेठ गोगावले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ४५ विद्यार्थ्यांची समस्या सुटावी, अशी अपेक्षा छत्रीनिजामपूर ग्रामस्थांची आहे.