बिरवाडी : महाड तालुक्यातील आंबेशिवथर ग्रामपंचायतीमधील काळ नदीपात्रावरील धोकादायक साकवामुळे (पूल) विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे विद्यार्थ्यांना दोन कि.मी.चा पायी प्रवास करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.जुलै २०१७ मध्ये आंबेशिवथर व कुंभे शिवथर या गावांना जोडणारा काळ नदीवरील साकवाचा काही भाग वाहून गेला होता, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी लाकडी काठ्या व पत्रे टाकून हा साकव तात्पुरता वापरात आणला होता. मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने हा साकव ये-जा करण्याकरिता धोकादायक असल्याचे जाहीर केल्याने अतिवृष्टीच्या काळात विद्यार्थ्यांना आंबेशिवथर मधून कुंभे शिवथर येथील समर्थ विद्यामंदिर शिवथर या शाळेमध्ये जाण्याकरिता पायपीट करावी लागते.नदीपात्राच्या पलीकडे असणाऱ्या सह्याद्रीवाडी येथील २२ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे दोन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. सदरचा साकव वापराकरिता बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी बांधकाम विभागाने या साकवाची दुरुस्ती अथवा नूतनीकरण केले नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता जि.प. सदस्य मनोज काळीजकर यांच्याशी संपर्क साधला असता, धोकादायक साकवाच्या दुरुस्तीचा व नूतनीकरणाचा प्रस्ताव एक वर्षापूर्वीच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बांधकाम विभागाने उत्तर देताना सदरचा साकव हा पूरहानीमुळे नादुरु स्त झाल्याचे उत्तर दिले असले, तरी जिल्हा परिषदेने या कामाकरिता तत्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.
पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास ; पर्यायी मार्गासाठी दोन किमीची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 2:58 AM