अलिबाग : मातृभाषा टिकवायची असेल तर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच मातृभाषेतून शिक्षण देणे अनिवार्य केले पाहिजे, असा सूर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी आळवला. जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ आणि सीएफटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये पीएनपी नाट्यगृहात सुरू असलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक दर्जाच्या संमेलनात सरस्वतीच्या प्रांगणात या परिसंवादात बोलताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, जपान येथे वास्तव्यास असणारे डॉ. जगन्नाथ पाटील, भंडारा येथील मुबारक शेख यांनी आपापली मते विस्तृतपणे मांडली.देशाची भावी पिढी घडवायची असेल तर विद्यार्थ्यांना माणूस बनवा, रोबो नको, असे ठाम प्रतिपादन भंडारा जिल्ह्यातील खराशी गावातील प्रयोगशील शिक्षक मुबारक सय्यद यांनी केले.परिसंवादात त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक प्रयोगशील शिक्षक म्हणून काम करताना आलेले चांगले, वाईट अनुभव त्यांनी उपस्थिताना सांगितले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगशील उपक्रमाचे उपस्थितांकडूनही स्वागत आणि कौतुक करण्यात आले. मी, ज्या भागात शिकवितो, तो भाग नक्षलप्रवण; पण तेथेही मी जिद्दीच्या जोरावर काहीतरी बदल करून दाखविले. त्यासाठी अनेकांकडून विरोधही झाला. अनेकदा विरोध करणारे माझे सहकारीच होते, हे पाहून अचंबितही झालो; पण त्याच तक्रारखोरांमुळे मी नेहमी यशस्वी होत राहिलो, हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.मुबारक सय्यद यांनी आपण शाळेतील १४८ पोरांचा बाप असल्याचे आवर्जून नमूद केले. या शाळेत अनेक प्रयोग केल्याने गावकऱ्यांचा एवढा विश्वास बसला की, एखाद्याला आपल्या मुलीचे लग्न जरी करायचे असेल तर तो नवरा मुलगा जर सय्यद गुरुजींना पसंत पडत असला तरच मुलीचे बाप तिचे लग्न लावून देण्यास तयार होतात, असा किस्साही त्यांनी सांगितला. याशिवाय शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली स्कूलबँक हेसुद्धा आपल्या यशाचे गमक असल्याचे ते म्हणाले. आज त्या बँकेत विद्यार्थ्यांचे पाच लाख ६४ हजार रुपये जमा आहेत. त्यातून या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, कपडे खरेदीसाठी मदत होते, असे ते म्हणाले.हे उपक्रम पाहून गावातील ग्रामस्थांनी देवळातील दानपेटीच शाळेत आणून ठेवली आहे. शिवाय मुलांना मुक्त शिक्षण मिळावे म्हणून आम्ही शाळेतील घंटादेखील काढून टाकल्याचे सय्यद म्हणाले.जपान येथील डॉ. जगन्नाथ पाटील भारतात शिक्षक आणि संस्थांना जे सरकारकडून भरमसाठ अनुदा दिले जाते ती पद्धत बंद होणे गरजेचे आहे. यामुळे ज्या कारणांसाठी हे अनुदान मिळते त्याचा कितपत विनियोग होतो, हे पाहणेदेखील गरजेचे आहे, असे म्हणाले. हे अनुदान थेट विद्यार्थ्यांना मिळाले तर निश्चितच त्याचा फायदा होईल. जपानमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळते; पण ते कर्ज त्या विद्यार्थ्यालाच फेडावे लागते हेसुद्धा सूचित केले.>भारतीय शिक्षण व्यवस्थेलाबकालपणा- जगन्नाथ पाटीलजपान, जर्मनी, अमेरिका सारख्या प्रगत देशात शिक्षणाला जेवढे महत्त्व आहे, तेवढे महत्त्व भारतीय शिक्षणाला नाही; एकप्रकारे देशातील शिक्षण व्यवस्थेला बकालपणा आला असल्याची टीका जपान येथील डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. परिसंवादात बोलताना त्यांनी भारतीय शिक्षण आणि अन्य देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले.देशात युवकांची संख्या लक्षणीय आहे, त्यांना योग्यप्रकारे शिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यात निराशेचे वातावरण निर्माण होत आहे. एकप्रकारे देशातील शिक्षण क्षेत्राला सुमारपणा, बकालपणा याचा सागर पसरलेला दिसतो. त्यातून हातावर बोटावर मोजण्या इतकीच बोटे शिक्षण क्षेत्रात यशस्वी झाल्याचे म्हणाले.जपानसारख्या प्रगत देशात मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची सक्ती आहे. अगदी बालवयातच त्याच्यावर राष्ट्र, शिस्तीचे धडे दिले जातात. त्याच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर भर देण्याचे काम तेथील राज्यकर्ते करीत असतात. त्या तुलनेने भारतात हे घडत नाही.भारतात शिक्षणावर खर्च भरपूर आहे. सध्या शिक्षण क्षेत्रात कास्ट ऐवजी कॉस्टला महत्त्व प्राप्त झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ज्या शिक्षण संस्थांच्या इमारती दर्जेदार आहेत, तिथे पायाभूत सुविधा मुबलक आहेत, तेथे भरमसाठी फी आकारून विद्यार्थी प्रवेश घेतात, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.>दर्जेदार शिक्षण संस्थांची निर्मिती करण्यात यशस्वी -पी.डी.पाटीलराज्यात डॉ.डी.वाय.पाटील ही दर्जेदार शिक्षण संस्था निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो असल्याचा दावा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केला आहे.सरस्वतीच्या प्रांगणात या परिसंवादात बोलताना पी. डी. पाटील यांनी शिक्षण संस्था उभी करताना आलेल्या अनुभवांची माहिती उपस्थितांना दिली. विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या मानवी दूधबँकेची माहितीही त्यांनी या वेळी दिली. २४ लाख मिली लीटर दूध या माध्यमातून संकलित करून ते पुरविले जाते, असे ते म्हणाले.देशात जर शिक्षण व्यवस्था बळकट करायची असेल तर सरकारने त्याच दर्जार्च शिक्षकही निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सूचित केले. आज एखादी संस्था पाहूनच पालक आपल्या पाल्यांना त्या त्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास सांगत आहेत, असे पी. डी. पाटील म्हणाले.
विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळावे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:55 AM