- गिरीश गोरेगावकर माणगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे उलटली. मात्र, दऱ्या-खो-यात, डोंगरकडा-कपारीत वसलेली गावे आजही रस्ते, शाळा, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आजही पाहायला मिळत आहे. माणगाव-महाड तालुक्याच्या वेशीवर वसलेल्या उंबरी व आजूबाजूच्या जवळपास पाच ते सहा वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना डोंगरदºयांतून दररोज तीन-चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. बाजारहाट करणे असो वा गावात दूध पोहोचणे, वाहतुकीचे कोणतेच साधन नसल्याने ग्रामस्थांना पायपीट करीतच माणगाव गाठावे लागते.माणगाव तालुक्यातील उंबरी नेराव हे गाव खर्डी खुर्द या गावापासून कमीत कमी तीन ते चार किलोमीटर लांब असून, गावातील पायवाट जंगलातून आहे. उंबरी नेराव येथील नागरिकांना प्रत्येक कामासाठी व व्यवसायासाठी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना माणगाव गाठावे लागते; परंतु हा मार्ग अत्यंत खडतर आहे. डोंगराळ भागातील पाच ते सहा गावांतील लोकसंख्या साधारण चार ते पाच हजारांच्या सुमारास आहे; परंतु या गावांना माणगावपर्यंत येण्यासाठी गेल्या ७२ वर्षांत रस्ता झालेला नाही. निवडणुकांवेळी राजकीय मंडळी समस्या सोडविण्याचे आश्वासन देतात. मात्र, निवडणूक झाली की गावांकडे पाठ फिरवत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. माणगाव तालुक्यातील डोंगरभागातील गावांमध्ये किमान मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.>शाळेत जाण्यासाठी तासभर पायपीटगेली २५ ते ३० वर्षे या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्ते, पाणी आदी मूलभूत सुविधांसाठी अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा करूनही परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्याने जाण्यासाठी कोणतेही वाहन सोडा; परंतु पायी चालत जाणेही जिकरीचे झाले आहे.शाळेत जाण्यासाठी सकाळी ५ वाजता उठावे लागते. त्यानंतर डोंगरातून एक तास चालत जाऊन शाळेत जावे लागते. संध्याकाळी उशिरा घरात आल्यावर आम्ही थकलेलो असतो, त्यामुळे अभ्यास करायला वेळ मिळत नसल्याचे गावातील शालेय विद्यार्थी सांगतात.उंबरी-नेराव या पाच ते सहा वाड्यांमधील मुलांना या परिस्थितीमुळे लग्नासाठी कोणीही मुलगी देण्यास अथवा सोयरिक करण्यास धजावत नाही.जगण्यासाठी करावा लागतो संघर्षडोंगरभागात अनेक हिंसक प्राणी आहेत, त्यांचा सामना करावा लागतो. एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला बांबूच्या झापामध्ये डोली करून संपूर्ण डोंगर त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन खाली उतरावे लागते. एखादा आजारी रु ग्ण अथवा गरोदर महिलेला या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला, तरी ती व्यक्ती घरी सुखरूप परत येईल, याची शाश्वती नाही, त्यामुळे जीवावर उदार होऊन आपले काम व विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्याकरिता दररोज तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या ७२ वर्षांत कोणत्याही मंत्र्याला अथवा नेत्याला आमची अडचण दूर करता आली नाही; त्यामुळे यापुढे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नेत्याला व मंत्र्याला या पाच ते सहा गावांत पाऊल टाकू देणार नाही. आमच्या मूलभूत हक्कासाठी लहान मुलाबाळांसह आमरण उपोषणही करण्यासही मागे राहणार नाही, अशा परखड भाषेत ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर निषेध केला. खर्डी खुर्द ते उंबरी-नेराव या रस्त्याला शिवकालीन इतिहास असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हा रस्ता आहे. खर्डी खुर्द ते उंबरी-नेरावपासून रायगड फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता झाल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल, त्यासाठी या पाच ते सहा गावांतील ग्रामस्थांनी अगदी मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतसुद्धा पाठपुरावा केला; त्यामध्ये वनविभाग खातेही यासाठी मंजुरी देत नाही.>दु:ख एवढेच होतेय की, आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनही नेराव, सुतारवाडी, उबंरी, उन्ड्रे वाडी व बनगेवाडीसाठी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली नाही. तरी आम्ही ग्रामस्थ आपल्या प्रसारमाध्यमांद्वारे सरकारला जाब विचारतोय, तसेच याबाबत आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. तसेच येथील दुग्ध व्यवसाय मोठा असून, रोज २०० ते २५० लिटर दूध माणगावपर्यंत या रस्त्यामुळे पोहोचविणे अवघड होत असून, या शालेय विद्यार्थ्यांना ही वाट चालताना खूप शारीरिक हाल सहन करावे लागत आहेत.- सुनील कोरपे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, नेराव
रस्त्याअभावी विद्यार्थ्यांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:27 AM